फोटो सौजन्य - Social Media
देशात प्रथमच प्रायोगिक तत्वावर राबविण्यात आलेल्या या उपक्रमात १२० शाळा, ८०० हून अधिक शिक्षक आणि सुमारे १८ हजार विद्यार्थी सहभागी झाले. इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या ‘मीना राजू मंच’च्या माध्यमातून लिंग समानतेचे विविध पैलू सुलभ पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आले. राज्य शिक्षण विभागाच्या शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) यांच्या सहकार्याने हा प्रकल्प राबविण्यात आला.
समाजातील परंपरा, रूढी आणि दैनंदिन वास्तव मुलांच्या जगाकडे पाहण्याच्या दृष्टीला आकार देत असतात. ग्रामीण महाराष्ट्रात, विशेषतः मराठवाड्यासारख्या मागास भागात जिथे सामाजिक निर्देशांक राज्याच्या सरासरीपेक्षा मागे आहेत, तिथे दैनंदिन वास्तवाचा मुलींवर मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडतो. अशाही चाकोरीबद्ध जीवनामध्ये थोड्याशा जनजागृतीमुळे बदल घडू शकतात. अशीच एक कथा आहे आरती घोडके हिची. धाराशिव जिल्ह्यातील देवळाली येथील जिल्हा परिषद शाळेत ती इयत्ता आठवीत शिकते. आरती सर्वसामधारण कुटुंबातील असून तिचे वडील तंत्रज्ञ म्हणून काम करतात आणि आई घर सांभाळते. तिचा मोठा भाऊ नववीत शिकतो. या भागातील अनेक कुटुंबांप्रमाणे त्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न मर्यादित असले तरी मूल्यं मात्र प्रामाणिक आहेत.
वाढत्या वयात आरतीने मुली आणि महिलांवर होणारे भेदभावाचे अनेक प्रकार पाहिले आणि ऐकले आहेत. काही शेजाऱ्यांनी मुलींचे शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच त्यांचे लग्न लावून दिले. स्त्रीभ्रूणहत्येबद्दल कुजबुज अनेकदा कानावर येते. मुलींचे मुख्य काम हे चूल आणि मूल सांभाळात घराची जबाबदारी घेण्याचे आहे, पण नेतृत्व वगैरे हे त्यांना झेपणारे नाही, अशा परंपरावादी संकल्पना एेकतच ती मोठी झाली. अशा वातावरणात लहानाची मोठी झालेली आरती मात्र आता वेगळा विचार करते आणि म्हणूनच तिची कथा विशेष ठरते. महिलांवर होणाऱ्या अन्यायाची तिला जाणीव आहे आणि तो थांबवण्याचा तिचा निर्धारही आहे. ती स्पष्टपणे म्हणते, “मला स्त्रीभ्रूणहत्या आणि बालविवाह यांची खूप चिंता वाटते. एक मुलींना जन्म घेऊ देत नाही, तर दुसरा त्यांचे बालपण हिरावून घेतो. मुलींना संधी आणि कुटुंबाचा आधार मिळाला तरच त्या पुढे जाऊ शकतात. हे अन्याय थांबवण्यासाठी मला पोलीस अधिकारी व्हायचे आहे. मी खूप मेहनत करून हे स्वप्न पूर्ण करेन. माझे कुटुंब मला पाठिंबा देईल,” आरती म्हणाली.
अर्थात रुढीवादी समाजामध्ये हा विचार अचानक आलेला नाही. दोन वर्षांपूर्वी आरती मीना राजू मंचच्या सत्रांना जाऊ लागली आणि तिथेच या समतेच्या विचारांची बीजं रुजली. अंगाई-युनिसेफतर्फे (UNGEI-UNICEF) लिंग समभाव हा विषय खेळाधारित शिक्षणाद्वारे किशोरवयीन मुले-मुली, शिक्षक आणि गावातील समुदायांना शिकवण्यात आला. मीना राजू मंच हा इयत्ता ६ ते ८ वीचे विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात आला असून लिंग समभावाशी संबंधित विविध पैलूंची माहिती त्यांना करून देण्यात आली. त्यामध्ये संवाद, खेळ, चर्चा अशा विविध उपक्रमांचा समावेश होता. या कार्यक्रमाला स्थानिक संस्था स्वयं शिक्षण प्रयोग (एसएसपी), कोरो आणि मावा यांचा सहभाग होता. त्यामध्ये शाळांसोबतच ग्रामपंचायत, गावातील लोक आदींनाही सहभागी करून घेण्यात आलं. देशात प्रथमच प्रायोगिक तत्वावर राबविण्यात आलेल्या या उपक्रमात १२० शाळा, ८०० हून अधिक शिक्षक आणि सुमारे १८ हजार विद्यार्थी सहभागी झाले. इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या ‘मीना राजू मंच’च्या माध्यमातून लिंग समानतेचे विविध पैलू सुलभ पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आले. राज्य शिक्षण विभागाच्या शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) यांच्या सहकार्याने हा प्रकल्प राबविण्यात आला.
आरती सांगते, “पूर्वी मला लिंग समभाव विषयाबद्दल काहीच माहिती नव्हती. स्वयंसेविका ताई आम्हाला सांगत असत की मुलगे आणि मुली एकसारखे आहेत त्यामुळे त्यांना समान वागणूक द्यायला हवी, समान संधी मिळायला हव्यात. पण माझ्या आजूबाजूला मी कायम मुलगा आणि मुलगी असा भेदभाव पाहिला आहे. त्याला प्रश्न विचारल्याशिवाय बदल होत नाहीत, हा आत्मविश्वासही मला लिंग समभावाच्या सत्रांनी दिला. त्या सत्रांमुळे मला प्रथमच कळलं की मुलगे आणि मुली समान आहेत. आपण सगळे सारखी कामे करू शकतो. पण समाजातील पूर्वग्रह मुलींना नियमांनी बांधून ठेवतात आणि संधी नाकारतात,” ती म्हणाली.
या नवीन विचारांनी प्रेरित होऊन आरतीने शाळेत, शेजारी आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे घरीही आवाज उठवायला सुरुवात केली. तिने सर्वप्रथम आईशी लिंग समभावाबद्दल बोलायला सुरुवात केली. तिची आई हे नवीन विचार एेकून आश्चर्यचकित झाली. आरती म्हणते, “तिने कधीही या दृष्टिकोनातून विचार केला नव्हता. पण प्रत्येक सत्रात होणाऱ्या चर्चा मी तिला सांगितल्या आणि अनेक गोष्टी आईनेही मान्य केल्या,” आरती म्हणाली.
तिचा भाऊही या कार्यक्रमात सहभागी झाला होता. तो तिच्या विचारांशी सहमत झाला. आरती सांगते, “त्याने अनेक ठिकाणी होत असलेला मुलगा-मुलगी भेदभाव मान्य केला. त्यामुळे घरातली परिस्थिती बदलायला मदत झाली,” ती म्हणाली. आज त्यांच्या घरात अनेक बदल दिसतात. आरतीचे वडील आणि भाऊ घरातील कामात हातभार लावतात. सकाळी ते अंथरूण उचलतात, घर झाडतात आणि स्वयंपाकात मदत करतात. आरती अभिमानाने सांगते, “आमच्या कुटुंबासाठी हा मोठा बदल होता. काही नातेवाईकांनी टीका केली की मुलांनी ‘बायकांची कामे’ करू नयेत. पण माझे वडील आणि भाऊ त्या दबावाला बळी पडले नाहीत.”
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-५ च्या आकडेवारीनुसार, मराठवाड्यामध्ये जवळपास चार मुलींमधील एक मुलगी १८ वर्षांपूर्वीच विवाहबद्ध होते. अशा परिस्थितीत आरतीसारखा आवाज दुर्मीळ पण आवश्यक आहे. ती बदलाची वाट पाहत नाही. ती स्वतः बदल घडवत आहे. त्या प्रक्रियेत ती स्वतःसाठीच नव्हे तर अनेक मुलींसाठी नवा मार्ग तयार करत आहे. घरातील हा बदल शाळांमधील व्यापक बदलाचाही भाग आहे. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी मुलगे आणि मुली वर्गाबाहेर फारसे एकत्र बोलत नसत. आता ते एकत्र बसतात, खेळतात आणि मैत्रीने संवाद साधतात. शिक्षक सांगतात की, मुलांमध्ये सहानुभूती वाढली आहे, चिडवणे कमी झाले आहे आणि दोघांमध्ये अधिक समावेशक वातावरण तयार झाले आहे.
मुलगा-मुलगी भेदभावाप्रती असलेली आरतीची जाणीव आणखी एका उपक्रमामुळे वाढली. मीना राजू मंचच्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या दिवसाचे वेळापत्रक दाखवण्यासाठी घड्याळ रंगवायला सांगितले होते. आरती म्हणते की, “शाळेनंतर मुलींचा बहुतेक वेळ घरकामात किंवा शेतात मदत करण्यात जातो. अभ्यास, खेळ किंवा विश्रांतीसाठी आमच्याकडे फारसा वेळ राहत नाही. मुलगे मात्र जास्त वेळ खेळतात किंवा टीव्ही पाहतात. जबाबदाऱ्या जास्त असूनही मुलींना स्वातंत्र्य कमी मिळते.” अशा अनेक जाणिवांमुळे पोलीस अधिकारी होण्याचा तिचा निर्धार आणखी मजबूत झाला. तिने आजी-आजोबांनाही लिंग समभावाबद्दल माहिती दिली आणि ते विचार समजावण्याचा प्रयत्न केला. आरती म्हणते, “त्यांची विचारसरणी पारंपरिक आहे. त्यांना लिंग समभाव सहज पटत नाही. पण मी प्रयत्न सोडलेले नाहीत. माझ्या आई-वडिलांमध्ये बदल झाला, तसा हळूहळू त्यांच्यातही होईल, अशी मला आशा आहे.”
आता आरतीने स्वतःसाठी मोठे ध्येय ठरवले आहे. ती म्हणते, “मुलींसाठी शिक्षण मोफत आहे, तरीही अनेक मुली शाळा सोडतात. स्त्रीभ्रूणहत्या कायद्याने गुन्हा आहे, तरीही ती घडते. बालविवाह कायद्याने गुन्हा आहे, तरीही गुपचूप होतात. कायदे आहेत, पण त्यांची अंमलबजावणी होत नाही. म्हणून मला आयपीएस अधिकारी व्हायचे आहे, जेणेकरून हे कायदे कडकपणे लागू करता येतील आणि प्रत्येक मुलीला सुरक्षितता, शिक्षण आणि संधी मिळेल.”
तिचं ध्येय पूर्ण करण्यासाठी ती मन लावून अभ्यास करते, लिंग समभावावर वाचते आणि न्यायाबद्दल आत्मविश्वासाने बोलते. तिचं स्वप्नं केवळ स्वप्नं नाहीये. ते तिच्या समाजातील वास्तवातून तयार झालं पावलं आहे. लिंग समभावसारख्या उपक्रमांमुळे हे स्वप्नं तिच्या एकटीचं राहिलेलं नाही. बदल घडवू पाहणारी तिच्यासारखी अनेक मुलं-मुली, तरुण आणि ज्येष्ठ यामध्ये सहभागी झाले आहेत.
( अंगाई-युनिसेफतर्फे (UNGEI-UNICEF) लिंग समभाव हा विषय खेळाधारित शिक्षणाद्वारे किशोरवयीन मुले-मुली, शिक्षक आणि गावातील समुदायांना शिकवण्यात आला. मीना राजू मंच हा इयत्ता ६ ते ८ वीचे विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात आला असून लिंग समभावाशी संबंधित विविध पैलूंची माहिती त्यांना करून देण्यात आली. त्यामध्ये संवाद, खेळ, चर्चा अशा विविध उपक्रमांचा समावेश होता. या कार्यक्रमाला स्थानिक संस्था स्वयं शिक्षण प्रयोग (एसएसपी), कोरो आणि मावा यांचा सहभाग होता. त्यामध्ये शाळांसोबतच ग्रामपंचायत, गावातील लोक आदींनाही सहभागी करून घेण्यात आलं.)
संकलन – श्रुति गणपत्ये, माध्यम सल्लागार – युनिसेफ महाराष्ट्र






