पनवेल येथील पिल्लई अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आयटी द्वितीय वर्षाच्या परीक्षेतील उत्तरपत्रिका चोरीला गेल्याची घटना घडली होती. संबंधित उत्तरपत्रिका दुचाकीवरून पळविण्यात आल्या होत्या आणि त्या उत्तरपत्रिका मंदिराबाहेर गाडी थांबवल्यावर चोरून नेण्यात आल्या. या घटनेमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने नेरळ पोलिसांनी तातडीने कारवाई करत अवघ्या ३६ तासांत खालापूर येथून एका तरुणाला ताब्यात घेतले. आरोपीने आर्थिक फायद्यासाठी हा गुन्हा केल्याचे कबूल केले आहे.
२७ फेब्रुवारी २०२५ रोजी पनवेलच्या प्रसिद्ध पिल्लई कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील प्राध्यापक हे सुट्टीच्या दिवशी उत्तरपत्रिका तपासण्यासाठी आपल्या घरी नेरळ येथे घेऊन येत होते. आयटी इंजिनिअरिंगच्या द्वितीय वर्षाच्या “वैयक्तिक आर्थिक व्यवस्थापन” या विषयाच्या १३६ उत्तरपत्रिका, हजेरीपत्रक आणि प्रश्नपत्रिका त्यांनी सोबत घेतल्या होत्या. प्राध्यापक हे त्यांच्या मित्रासोबत (स्वप्नील वायंगनगर) दुचाकीवरून पनवेल ते नेरळ ममदापूर मार्गे प्रवास करत होते.
नेरळजवळील उकरुळ येथील श्री साईबाबा मंदिरात सायंकाळी ७:२० वाजता दर्शनासाठी थांबले असता त्यांनी उत्तरपत्रिकांची बॅग दुचाकीच्या हँडलला लावून गाडी पार्क केली. मात्र, मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आल्यावर उत्तरपत्रिकांची बॅग चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर, त्यांनी तातडीने नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला.
पोलीस तपास आणि आरोपीचा शोध
या प्रकरणात नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २३/२०२५ नोंदवून, भा.दं.सं. कलम ३०७ (इ) अंतर्गत कारवाई सुरू करण्यात आली. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात येऊ नये म्हणून पोलीस उपविभागीय अधिकारी डी.डी. टेळे आणि प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक तयार करण्यात आले.
पोलीस उपनिरीक्षक संदीप फड, एस.डी. किसवे, हवालदार सचिन वाघमारे, किसवे, राजाभाऊ केकण आणि बेंद्रे यांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे संशयिताचा शोध सुरू केला. तपासादरम्यान, आरोपी रुपेश भानुदास साळुंखे (खालापूर तालुका, उंबरे वाडी) याने आर्थिक फायद्यासाठी हा गुन्हा केल्याचे उघड झाले. त्याला खालापूर येथून अटक करून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पोलीस प्रशासनाचे कौतुक: उत्तरपत्रिका चोरी प्रकरण केवळ ३६ तासांत उघड करणाऱ्या नेरळ पोलीस ठाण्याच्या तपास पथकाचे जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घारगे आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक अभिजित शिवतारे यांनी विशेष कौतुक केले आहे.