फोटो सौजन्य - Social Media
भारत सरकारने शिक्षण क्षेत्रात एक ऐतिहासिक आणि भविष्याभिमुख निर्णय घेतला आहे. आता देशातील सर्व शाळांमध्ये इयत्ता तिसरीपासून आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) शिकवले जाणार आहे. हा विषय २०२६-२७ शैक्षणिक वर्षापासून अधिकृतपणे अभ्यासक्रमात समाविष्ट होईल. उच्च शिक्षण मंत्रालयाचे सचिव संजय कुमार यांनी सांगितले की, केंद्र, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील शाळांमध्ये एआय विषय समाविष्ट करण्याची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. पुढील दोन वर्षांत अभ्यासक्रम तयार करणे, शिक्षकांना प्रशिक्षण देणे आणि शिक्षण साधने उपलब्ध करणे या सर्व टप्प्यांची पूर्तता केली जाणार आहे.
या उपक्रमासाठी सीबीएसई (CBSE)ने आधीच पुढाकार घेतला आहे. आयआयटी मद्रासचे प्रा. कार्तिक रमण यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती वर्गनिहाय एआय अभ्यासक्रम तयार करत असून, विद्यार्थ्यांना केवळ तांत्रिक ज्ञानच नव्हे तर एआयचा नैतिक वापर या विषयावर भर देणार आहे. त्याबद्दलची जबाबदारी आणि मानवी मूल्यांची समज यावरही भर देणार आहे.
सध्या सीबीएसईच्या शाळांमध्ये इयत्ता सहावी ते बारावीपर्यंत एआयशी संबंधित विषय शिकवले जातात. मात्र, आता ही शिकवणी तिसरीपासूनच सुरू झाल्याने भारतातील शिक्षण प्रणाली आणखी आधुनिक, तंत्रज्ञानाभिमुख आणि डिजिटल अर्थव्यवस्थेसाठी सक्षम ठरेल.
शिक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशभरात एक कोटीहून अधिक शिक्षक कार्यरत आहेत. या सर्व शिक्षकांना एआय शिक्षणासाठी प्रशिक्षण देणे हे मोठं आव्हान आहे. तरीही, मंत्रालयाचा विश्वास आहे की या प्रशिक्षणामुळे भारतातील पुढील पिढी एआय तंत्रज्ञानात निपुण, सर्जनशील आणि भविष्याच्या गरजांसाठी पूर्णपणे सज्ज होईल.
AI मुळे शिक्षणात होईल फायदा
एआयमुळे शिक्षण अधिक स्मार्ट, वैयक्तिक आणि प्रभावी होणार आहे. विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या गतीनुसार अभ्यासक्रम समजावून सांगणे, चुका ओळखून त्यावर मार्गदर्शन करणे आणि शिक्षकांना अध्यापन सुलभ करणे, या सर्व गोष्टींमध्ये एआय महत्त्वाची भूमिका बजावेल. त्यामुळे शिक्षण अधिक आकर्षक, परिणामकारक आणि भविष्याभिमुख बनेल.






