फोटो सौजन्य - Social Media
देशातील सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या संघ लोक सेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत दरवर्षी लाखो तरुण सहभागी होतात. या कठीण शर्यतीत यश मिळवणारे आपले आयुष्यच बदलून टाकतात. अशाच यशस्वी तरुण अधिकाऱ्यांपैकी एक नाव म्हणजे अर्चित चंदक. २०१८ मध्ये त्यांनी UPSC सिव्हिल सर्व्हिस परीक्षेत ऑल इंडिया रँक १८४ मिळवत भारतीय पोलीस सेवेत (IPS) आपले स्थान पक्के केले.
अर्चित चंदक यांचा जन्म महाराष्ट्रातील नागपूरमध्ये झाला. ते बालपणापासूनच अभ्यासात हुशार होते. २०१२ मध्ये झालेल्या JEE परीक्षेत त्यांनी नागपूर टॉपर ठरून आपली बुद्धिमत्ता सिद्ध केली. पुढे त्यांनी आयआयटी दिल्ली येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी पूर्ण केली.
इंजिनिअरिंगच्या काळातच एका नामांकित जपानी कंपनीने अर्चित यांना तब्बल ३५ लाख रुपयांच्या वार्षिक पॅकेजची ऑफर दिली. ही कोणत्याही विद्यार्थ्यासाठी मोठी संधी असते. मात्र अर्चित यांनी या मोहाला बळी न पडता देशसेवेचा मार्ग निवडला. त्यांनी कॉर्पोरेट जीवन आणि उच्च पगाराला नकार देत UPSC परीक्षेची तयारी सुरू केली. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी ही परीक्षा उत्तीर्ण करून IPS होण्याचं स्वप्न पूर्ण केलं.
IPS अधिकारी म्हणून अर्चित यांची पहिली पोस्टिंग भुसावलच्या बाजारपेठ पोलीस ठाण्यात SHO म्हणून झाली. येथे त्यांनी प्रामाणिकपणा, मेहनत आणि लोकाभिमुख कामगिरीच्या जोरावर नागरिकांचा विश्वास जिंकला. त्यानंतर त्यांची बदली नागपूर येथे DCP पदावर झाली. मे २०२५ मध्ये त्यांनी अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक (SP) म्हणून पदभार स्वीकारला आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी केली.
अर्चित चंदक हे फक्त कर्तव्यदक्ष अधिकारी नाहीत, तर फिटनेसप्रेमीही आहेत. त्यांनी ४२ किलोमीटरची मुंबई मॅरेथॉन पूर्ण केली आहे. याशिवाय त्यांना बुद्धिबळाचीही आवड असून त्यांनी FIDE रेटिंग १८२० मिळवले आहे. वैयक्तिक आयुष्यात त्यांनी आपल्या UPSC बॅचमेट असलेल्या IAS सौम्या शर्मा यांच्याशी विवाह केला आहे. अर्चित चंदक यांची कथा हे दाखवते की, मोठ्या संधी नाकारून, ध्येयासाठी केलेला त्याग आणि मेहनत यामुळेच खरी ओळख निर्माण होते. त्यांचा प्रवास आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे.