फोटो सौजन्य- X
महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ येथे आज कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पुन्हा एकदा कौशल्य विकास विभागाचा कार्यभार स्वीकारला. प्रसंगी येत्या काळातील कौशल्य विकास विभागाची रूपरेषा आणि ध्येय सांगण्यासाठी मंत्री लोढा यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा विश्वासाने कौशल्य विकास विभागाची जबाबदारी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो”, असे लोढा यांनी यावेळी सांगितले.
१०० दिवसांसाठी विभागाची रूपरेषा आम्ही मुख्यमंत्री महोदयांकडे सुपूर्द करू
मंत्री लोढा म्हणाले, “कौशल्य विकास हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौशल्य विकासाची महाराष्ट्राला असलेली गरज ओळखून, त्याला नेहमीच महत्त्व दिले आहे. अगदी थोड्या कालावधीत पुढील १०० दिवसांसाठी विभागाची रूपरेषा आम्ही मुख्यमंत्री महोदयांकडे सुपूर्द करू. पुढील ५ वर्षांत ५ लाख युवकांना रोजगार देण्याचे आमचे लक्ष्य आहे, त्यासाठी आजपासूनच आम्ही कार्याला सुरुवात करणार आहोत. मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच पुढील ५ वर्षांचे ध्येय सुद्धा आपल्या समोर मांडू!”
वर्ल्ड बँकेच्या प्रतिनिधींसह विभागाची प्रथम बैठक
आज कार्यभार स्वीकारल्यानंतर लोढा यांनी लगेचच वर्ल्ड बँकेच्या प्रतिनिधींसह विभागाची प्रथम बैठक घेतली. वर्ल्ड बँकेने कौशल्य विकास, शासकीय औद्योगिक संस्थांचे उन्नतीकरण, रोजगार प्रशिक्षण या सर्व उपक्रमांसाठी ₹२२०० कोटींचे कर्ज कौशल्य विकास विभागाला दिले आहे. सर्व तरतुदी पूर्ण करून कर्जाची रक्कम लवकरात लवकर विभागाला कशी मिळेल, यासाठी आजच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. केंद्र सरकारद्वारे भारतातील १००० शासकीय औद्योगिक संस्थांना सहभागी केले आहे. महाराष्ट्रातील जास्तीत जास्त ITI चा यामध्ये समावेश असावा, यासाठी लवकरच केंद्रीय कौशल्य विकास मंत्री जयंत चौधरी यांची भेट घेणार असल्याचे देखील मंत्री लोढा यांनी आज सांगितले.
शनिवारी रात्री जाहीर झालेल्या मंत्रिमंडळ खातेवाटपामध्ये मलबार हिल मतदारसंघाचे आमदार, माजी मंत्री मंगलप्रभात लोढा यांना कौशल्य विकास विभागाचे खाते देण्यात आले. मागील कार्यकाळातही लोढा हे कौशल्य विकास विभागाचे मंत्री होते. होती. त्यांच्या काळात महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास विद्यापीठाची स्थापना झाली. त्यांनी घेतलेल्या प्रमुख निर्णयांमध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, आयटीआयचे नामांतरण,’हर घर दुर्गा अभियान’ असे असंख्य निर्णय होते.
मागील सरकारच्या काळात लोढा हे मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री होते. उच्चभ्रु लोकांचा मतदार संघ असलेल्या मलबार हिल विधानसभा मतदारसंघातून मंगलप्रभात लोढा हे 1995 पासून आमदार आहेत. 2024 च्या विधानसभा निवडणुकीतही ते विक्रमी मताधिक्क्याने ते निवडून आले आहेत.