(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
कलर्स मराठीवरील पिंगा गं पोरी पिंगा मालिकेत सतत ट्विस्ट येत असतात. 12 जानेवारीपासून या मालिकेत एक रहस्यमय वळण आल्याचे पाहायला मिळणार आहे.मालिकेत प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे एक गूढ, अस्वस्थ करणारा आणि थरारक प्रवास. मनोजच्या मावसभावाच्या लग्नासाठी वल्लरी, मनोज आणि इंदू गावाकडे जाण्याचा निर्णय घेतात. लग्नानंतर इंदू काही दिवस गावीच थांबते, तर मनोज आणि वल्लरी रात्रीचा प्रवास करून घरी परतत असतात. वाटेत एका अनोळखी ठिकाणी वल्लरीला एक लहान मुलगी एकटी, आई-वडिलांशिवाय बसलेली दिसते. तिच्याशी संवाद साधण्याचा आणि मदत करण्याचा प्रयत्न करताना वल्लरी आणि ती मुलगी एकमेकींपासून दुरावतात. घरी परतल्यानंतर नेहमी वेळेवर उठणारी वल्लरी सलग अठरा तास झोपून राहते आणि इथून सुरू होतो एक गूढ असामान्य बदल.
या घटनेनंतर वल्लरीचं वागणं मनोजसाठी अधिकच गोंधळात टाकणारं ठरतं. कधी मनोजला पाहून घाबरणं, कधी मध्यरात्री एकटक पाहत बसणं, तर कधी सकाळी रात्री घडलेल्या कोणत्याही घटनेची आठवण नसणं या सगळ्यामुळे मनोज अस्वस्थ होतो. संक्रांतीच्या निमित्ताने घरात आनंदाचं वातावरण असतानाच वल्लरीला तीच लहान मुलगी पुन्हा दिसते आणि तिला चक्कर येते. याच दरम्यान श्वेताचे बाबा घरात येतात आणि वल्लरीमध्ये झालेला बदल ओळखून पुढे येणाऱ्या संकटाची चाहूल मनोजला देतात. घराच्या उंबरठ्यावर दुष्ट शक्तींना रोखणारं तोरण लावलं जातं, आणि त्यानंतर ती मुलगी घरात प्रवेश करू शकत नाही तेव्हाच उलगडतं एक धक्कादायक सत्य की ती साधी मुलगी नसून एक आत्मा आहे.
घटनेचा उगम शोधण्यासाठी मनोज पुन्हा त्या जागेकडे जाण्याचा विचार करत असतानाच, एका निर्णायक रात्री वल्लरी तेजाकडे झोपायला जाते आणि तेव्हाच त्या आत्म्याला घरात शिरण्याची संधी मिळते. ती लहान मुलगी वल्लरीला मिठी मारून झोपी जाते, आणि याच क्षणी वल्लरीमध्ये एक भयानक परिवर्तन घडतं. पुढच्या दिवशी वल्लरी स्वतःला ‘जीविका जीरापुरे’ असल्याचं वैदर्भी भाषेत सांगू लागते. प्रेक्षकांसाठी हा क्षण स्पष्ट करतो की वल्लरी झपाटली गेली आहे. ही आत्मा नेमकी कोण आहे? तिचा उद्देश काय? आणि वल्लरीला या अंधारातून बाहेर काढणं शक्य होणार आहे का? या सगळ्यांची उत्तरं ‘पिंगा’च्या येणाऱ्या भागांमध्ये उलगडणार आहेत.






