भारतीय सैन्याला शिवसेनेकडून मदतीचा हात, शत्रूपासून आणि बदलत्या हवामानापासून संरक्षण व्हावे यासाठी दिले ५० कंटेनर
शिवसेनेची सिन्दुर महारक्तदान यात्रा १० ऑगस्ट २०२५ रोजी जम्मू आणि काश्मीरमध्ये गेली होती. त्यावेळी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्यासह महाराष्ट्रातील हजार पैलवानांनी शिवसेनेच्या माध्यमातून भारतीय सैन्यदलातील जवानांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजित केले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यावेळी या महारक्तदान यात्रेत सहभागी होऊन प्रत्यक्ष रक्तदान केले होते. त्यावेळी भारतीय सैन्य दलातील ब्रिगेडियर युद्धवीर सिंह सीखों यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे सीमेवर तैनात असलेल्या जवानांच्या सुरक्षिततेसाठी कंटेनर उपलब्ध करुन द्यावेत अशी मागणी केली होती.
‘ ऑपरेशन सिन्दुर’ नंतर भारत-पाकिस्तान सीमारेषेवरील युद्ध तंत्रात बराच फरक पडला आहे. या युद्धादरम्यान आणि आणि नंतरही पाकिस्तानकडून सीमावर्ती भागात ड्रोन हल्ले केले जातात. यावेळी सीमेवर तैनात असलेल्या जवानांना सुरक्षित स्थळी लपायचे असल्यास भूमिगत बंकरमध्ये लपण्यावाचून दुसरा पर्याय नाही. मात्र प्रत्यक्ष सीमारेषेजवळ सिमेंट काँक्रीटचे कायमस्वरूपी बंकर बनवणे अशक्य असल्याने कंटेंनरची मागणी सैन्यदलाकडून करण्यात आली होती. त्याचा वापर करून जलदगतीने बंकर उभारणे शक्य होते तसेच सैनिक, शस्त्र आणि इतर वस्तू सुरक्षित ठेवता येत असल्याने कंटेनर उपलब्ध करून देण्याची मागणी सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांनी शिंदे यांच्याकडे पत्र लिहून केली होती.
या विनंतीला मान देऊन शिवसेनेच्या वतीने ५० कंटेनर भारतीय सैन्याला देण्याचा निर्णय घेण्यात आला. यातील ४६ कंटेनर सीमेवर रवाना झाले असून अखेरचे चार कंटेनर आज देशाच्या सीमावर्ती भागात रवाना करण्यात आले. युवासेनेचे मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे त्यांच्या माध्यमातून हे कंटेनर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
भारतीय सैन्य दलाने हे कंटेनर स्वखर्चाने सीमावर्ती भागात घेऊन जाण्याची तयारी दर्शविल्याने उरण येथून हे उर्वरित चार कंटेनर सैन्यदलाच्या हवाली करण्यात आले आहेत. केलेल्या विनंतीला मान देत तत्काळ ही मदत उपलब्ध करून दिल्याबद्दल भारतीय सैन्यदलाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे आभार मानले आहेत. लवकरच सैन्याचे अधिकारी उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन याबाबतचे पत्र शिंदे यांना सुपूर्द करणार असल्याचे बाजीराव चव्हाण यांनी सांगितले आहे.






