(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिकेत ‘आई तुळजाभवानी’ची कथा आता एका ऐतिहासिक, भव्य आणि दैवी टप्प्यावर पोहोचली आहे. जगदंबाच्या आयुष्यातील घटनांची मालिका आता फक्त वैयक्तिक संघर्षापुरती मर्यादित राहणार नाही; ती संपूर्ण भुलोकाच्या भविष्याशी जोडली गेली आहे. प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी सुरू झालेला तिचा प्रवास, गूढ संकेत, दैवी कोडी आणि नियतीने आखलेला मार्ग या सगळ्यांनी कथानकाला अभूतपूर्व आध्यात्मिक उंची देत आहे. १२ ते १९ जानेवारीदरम्यान सुरू होणारा संक्रमणाचा सप्ताह हा केवळ वेळेचा बदल नाही, तर संपूर्ण ब्रह्मांडाच्या आवर्तनाचा निर्णायक टप्पा आहे. अंतराळात तरंगणारी एक विशाल सुवर्ण कवडी, त्यावर पडलेला तडा आणि त्यातून बाहेर पडणारे तेजस्वी प्रकाशकिरण हे स्पष्ट सूचित करतात की सृष्टीतील संतुलन ढळले आहे आणि परिवर्तन अटळ आहे. भुलोकाच्या रक्षणासाठी महायुद्धाची नांदी… महिषासुराचा अंत निश्चित कारण अवतरणार आई तुळजाभवानी.
या सगळ्या घडामोडींच्या केंद्रस्थानी आहे आई तुळजाभवानी. भुलोकाच्या रक्षणासाठी देवीचे अवतरण केवळ दैवी नाही, तर अपरिहार्य आहे. शिवतत्त्व, आदिशक्ती आणि तुळजाईची ऊर्जा हळूहळू एकरूप होताना दिसते आहे. संकेत, स्वप्नदृष्टांत आणि दैवी लीलांमधून देवी स्वतःलाच मार्ग दाखवत आहे. तिच्या सुप्त शक्ती जागृत होण्याची ही प्रक्रिया संपूर्ण सृष्टीच्या संतुलनासाठी अत्यावश्यक ठरणार आहे. आता हा प्रवास एका अत्यंत निर्णायक आणि भव्य क्षणाकडे वाटचाल करतो आहे महायुद्धाची नांदी.
एकामागोमाग एक प्रकट होणारी देवीची शस्त्रं धनुष्य, तलवार, गदा आणि अखेरीस शंख… प्रत्येक शस्त्र अधर्माविरुद्ध उभ्या ठाकणाऱ्या शक्तीचं प्रतीक ठरते. तेजस्वी, तीक्ष्ण नजरेने समोर पाहत देवीचा गर्जनाद होतो “महिषासुरा… तुझ्या पापाचा घडा भरलाय!” हा संवाद केवळ इशारा नाही, तर असुरांच्या संहाराची स्पष्ट घोषणा आहे. शंखनाद करताना देवीचं दिव्य, अष्टभुज विश्वरूप संपूर्ण भव्यतेने उलगडतं दोन हातात भुलोक, चार हातात शस्त्रं आणि दोन हातांनी होणारा शंखनाद. अधर्माचा अतिरेक आणि असुरांचा उन्माद आता अंतिम टप्प्यावर पोहोचला आहे.
देवीच्या आगमनाने संपूर्ण ब्रह्मांड हादरून जाणार असून, पुढील भागांमध्ये प्रेक्षक साक्षीदार होणार आहेत श्रद्धा, शक्ती आणि संहार यांच्या दिव्य संगमाच्या एका अभूतपूर्व अध्यायाचे. भुलोकाच्या रक्षणासाठी ‘आई तुळजाभवानी अवतरतेय… महायुद्धाची नांदी!






