दहावीची बोर्डाची परीक्षा वर्षातून दोनदा होणार, नवीन धोरण कधीपासून लागू? वाचा सविस्तर
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) दहावीच्या बोर्ड परीक्षा वर्षातून दोनदा आयोजित करण्यासाठी मसुदा तयार करण्यात आला आहे. वर्षातून दोनदा बोर्ड परीक्षा घेण्याची पद्धत २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून सुरू होण्याची शक्यता आहे. मसुद्यानुसार, पहिली बोर्ड परीक्षा फेब्रुवारी-मार्चमध्ये आणि दुसरी मेमध्ये होईल. हा मसुदा सार्वजनिक केला जाईल आणि सर्व भागधारक ९ मार्चपर्यंत त्यांचे अभिप्राय देऊ शकतात, त्यानंतर धोरणावर अंतिम शिक्कोमोर्तब होणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
मसुद्याच्या नियमांनुसार, सीबीएसई दहावीच्या बोर्ड परीक्षेचा पहिला टप्पा १७ फेब्रुवारी ते ६ मार्च दरम्यान होईल, तर दुसरा टप्पा ५ ते २० मे दरम्यान होईल. सीबीएसईच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “बोर्ड परीक्षांचे दोन्ही टप्पे संपूर्ण अभ्यासक्रमाच्या आधारे घेतले जातील आणि दोन्ही आवृत्त्यांसाठी उमेदवारांना समान परीक्षा केंद्रे वाटप केली जातील.” दोन्ही परीक्षांचे परीक्षा शुल्क अर्ज दाखल करताना ठरवले जाईल आणि उमेदवारांना ते नोंदणीच्या वेळीच जमा करावे लागेल.
अधिकाऱ्याने सांगितले की, ‘सीबीएसई दहावीच्या बोर्ड परीक्षांची पहिली आणि दुसरी आवृत्ती पूरक परीक्षा म्हणून काम करेल आणि कोणत्याही परिस्थितीत कोणतीही विशेष परीक्षा घेतली जाणार नाही.’ नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात (एनईपी) शिफारस करण्यात आली आहे की, बोर्ड परीक्षांमधील ‘हाय-स्टेक्स’ पैलू दूर करण्यासाठी, सर्व विद्यार्थ्यांना कोणत्याही शैक्षणिक वर्षात जास्तीत जास्त दोन वेळा परीक्षेला बसण्याची परवानगी देण्यात यावी. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिक्षण मंत्रालयाच्या एका महत्त्वाच्या बैठकीत या धोरणात्मक बदलावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
मसुद्यानुसार, सीबीएसई इयत्ता १०वी परीक्षा २०२६ १७ फेब्रुवारी ते ६ मार्च दरम्यान होणार आहे आणि दुसरा टप्पा ५ मे ते २० मे दरम्यान चालेल. संपूर्ण परीक्षा प्रक्रिया ३४ दिवस चालेल, ज्यामध्ये ८४ विषयांचा समावेश असेल. २०२६ मध्ये सुमारे २६.६० लाख विद्यार्थी सीबीएसई दहावीच्या परीक्षेत बसण्याची अपेक्षा आहे. भविष्यातही, सीबीएसई दहावी बोर्ड परीक्षा दरवर्षी १५ फेब्रुवारी आणि ५ मे नंतरच्या पहिल्या मंगळवारी सुरू होतील. दहावीच्या बोर्ड परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याच्या प्रस्तावाचा उद्देश विद्यार्थ्यांना त्यांची कामगिरी सुधारण्याची संधी देणे आहे, ज्यामुळे त्यांच्यावर परीक्षेचा दबाव आणि ताण कमी होईल.