फोटो सौजन्य - Social Media
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिक्षण महर्षी पांडुरंग हिरवे गुरुजी आणि शिक्षणव्रती भार्गव देशपांडे गुरुजी यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री म्हणाले की, “एक शिक्षक संपूर्ण समाज बदलू शकतो. शिक्षण हे केवळ ज्ञान देण्याचे साधन नसून समाज घडविण्याचे एक प्रभावी माध्यम आहे.” शिक्षण महर्षी हिरवे गुरुजी आणि देशपांडे गुरुजी यांनी शिक्षण क्षेत्रात अतुलनीय योगदान दिले असून त्यांच्या कार्याचा आदर्श नवीन पिढीसमोर राहील. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहूल नार्वेकर अध्यक्षस्थानी होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिक्षणाच्या महत्त्वावर भाष्य करताना सांगितले की, या दोन्ही थोर व्यक्तींनी शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तन घडवले. कोल्हापूर, सांगली आणि रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे 104 शाळा आणि एक वसतिगृह उभारून हिरवे गुरुजींनी शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवली. त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी हा पुतळा उभारण्यात आला आहे, जो समाजासाठी प्रेरणादायी ठरेल.
या कार्यक्रमाला पालकमंत्री प्रकाश आबिटकर, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उद्योग व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार गोपिचंद पडळकर, डॉ. विनय कोरे, अमल महाडिक, अशोक माने, राहुल आवाडे, शिवाजीराव पाटील, माजी मंत्री आण्णासाहेब डांगे, समित कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार डॉ. विनय कोरे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, शिक्षण क्षेत्रात हिरवे गुरुजींचे कार्य अभूतपूर्व आहे. त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. त्यांच्या आठवणी जपण्यासाठी आणि समाजाने त्यांच्या कार्याची जाणीव ठेवावी, म्हणून या पुतळ्यांची उभारणी करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांचे धनगरी ढोलाच्या गजरात स्वागत करण्यात आले. कार्यक्रमानंतर त्यांनी परमपूज्य सदगुरु चिले महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले.
हिरवे आणि देशपांडे कुटुंबातील सदस्य तसेच मौजे पैजारवाडीतील ग्रामस्थ या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. हिरवे कुटुंबातील बाजीराव हिरवे, तानाजी हिरवे, उल्हास हिरवे, उमेश हिरवे, विनोद हिरवे, प्रमोद हिरवे यांची विशेष उपस्थिती होती. देशपांडे कुटुंबीयांमध्ये श्रीमती शैलजा देशपांडे, ऋषीकेश देशपांडे, स्मिता टिपणीस, माधवी देशमुख, अश्विनी भावे, स्वाती खोपकर, मुक्ता देशपांडे यांचा समावेश होता. या अनावरण सोहळ्यामुळे शिक्षण महर्षी हिरवे गुरुजी आणि भार्गव देशपांडे गुरुजी यांच्या योगदानाची नव्या पिढीला जाणीव होईल आणि समाजात शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित होईल.