फोटो सौजन्य - Social Media
मुंबईत कामाच्या संधीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांना ससून रुग्णालयात अर्ज करता येणार आहे. ससून रुग्णालयात भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. परिचारिका आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांना भरण्यासाठी या भरतीला सुरु करण्यात आले आहे. मुळात, अर्ज करण्यासाठी उमेदवारांना फक्त ८ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या भरतीला सुरुवात करण्याचे आश्वासन वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत दिले. या भरतीच्या माध्यमातून एकूण ७८९ रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या भरतीला सुरुवात करण्याची मागणी आमदार सुनील कांबळे यांच्याद्वारे करण्यात आली होती.
ससून रुग्णालयात भरतीसाठी एकूण २,३५० जागा मंजूर करण्यात आले असून या पदांपैकी एकूण ७८९ पदे रिक्त आहेत. यातील ५०% जागा चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या पदासाठी आहे. तर एकूण १६० उमेदवारांना परिचारकांच्या पदासाठी नियुक्त केले जाणार आहे. महत्वाचे म्हणजे चतुर्थश्रेणी कामगारांची भरती ‘टीसीएस’च्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयाने करावी, असा आदेश देण्यात आला आहे. या भरतीच्या प्रक्रियेला अजून सुरुवात जरी झाली नसली तरी येत्या ८ दिवसांत भरतीची प्रक्रिया संपवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
रुग्णालयाला येत्या काळात अनेक समस्यांना सामोरे जावे लागले आहे. रुग्णालयात औषधांचा तुटवडा झाला आहे. नुकतेच ₹१२.९४ कोटींची औषध खरेदी करण्यात आली. नवीन वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्यात आली. तसेच जिल्हा नियोजन समितीकडे आणखी औषध खरेदीची मागणीदेखील करण्यात आली आहे. राज्यातील अनेक भागातून खासकरून पश्चिम महाराष्ट्रातून अनेक रुग्ण ससूनमध्ये उपचार घेण्यासाठी येतात. पण आल्यानंतर त्यांना आरोग्य सेवेत तसेच इतर पायाभूत सुविधांमध्ये कमतरता जाणवत असल्याच्या तक्रारी येत आहेत.
वैद्यकीय उपकरणे आणि शस्त्रक्रिया साधनसामग्रीचा तुटवडा जाणवत आहे. आपत्कालीन आणि सर्जरी विभाग योग्य प्रकारे कार्यरत नाही. अशा कारणांमुळे रुग्णांना खासगी रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागते, ज्यामुळे अनेक रुग्णांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तसेच रुग्णालयातील स्वच्छतेच्या बाबतीतही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या सर्व समस्यांवर राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी उत्तर दिले आहे. स्वच्छतेच्या कामाची तपासणी केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.