फोटो सौजन्य - Social Media
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी होणाऱ्या MHT CET परीक्षेच्या अर्ज नोंदणीची प्रक्रिया २७ फेब्रुवारी २०२६ रोजी पूर्ण झाली आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे इंजिनियरिंग, टेक्नॉलॉजी, फार्मसी, बी. प्लॅनिंग, एम. प्लॅनिंग (इंटिग्रेटेड) आणि अॅग्रीकल्चर एज्युकेशन या अभ्यासक्रमांसाठी पीसीएम आणि पीसीबी समूहाची प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. दरम्यान, अर्ज भरताना विद्यार्थ्यांकडून झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी ५ ते ७ मार्च २०२६ या कालावधीत ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
यंदा प्रथमच पीसीएम आणि पीसीबी समूहासाठी प्रवेश परीक्षेच्या दोन संधी देण्यात आल्या आहेत. या दोन्ही संधी मिळून तब्बल ११ लाख ४२ हजार ६१० विद्यार्थी परीक्षा देणार असल्याची माहिती सीईटी कक्षाने दिली आहे. या प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया १० जानेवारी २०२६ पासून सुरू झाली होती. सुरुवातीला अर्ज भरण्याची अंतिम मुदत १२ फेब्रुवारी होती. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या मागणीवरून २० फेब्रुवारीपर्यंत पहिली मुदतवाढ देण्यात आली. पुढे दुसरी आणि अंतिम मुदतवाढ २४ फेब्रुवारीपर्यंत देण्यात आली होती. यानंतर विलंब शुल्कासह २५ ते २७ फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरण्याची अंतिम संधी विद्यार्थ्यांना देण्यात आली.
पीसीएम आणि पीसीबी समूहाच्या या परीक्षेसाठी ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून परीक्षा शुल्क भरले आहे, त्यांनाच अर्जातील दुरुस्तीची सुविधा मिळणार आहे. अर्ज भरताना अनवधानाने झालेल्या चुका सुधारण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या लॉगिनद्वारे ऑनलाईन दुरुस्ती करावी लागणार आहे. या सुविधेमध्ये विद्यार्थ्यांना नाव, जन्मतारीख, छायाचित्र, सही, लिंग, पीसीएम किंवा पीसीबी समूहाची निवड तसेच दुसरी संधी समाविष्ट करण्यासारख्या तपशीलांमध्ये बदल करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
परीक्षेच्या वेळापत्रकाबाबतही सीईटी कक्षाने माहिती दिली आहे. पीसीएम समूहाच्या पहिल्या संधीची परीक्षा ११ ते १९ एप्रिल २०२६ दरम्यान होणार असून दुसऱ्या संधीची परीक्षा १४ ते १७ मे २०२६ दरम्यान घेतली जाणार आहे. तर पीसीबी समूहाच्या पहिल्या संधीची परीक्षा २१ ते २६ एप्रिल २०२६ दरम्यान होणार असून दुसऱ्या संधीची परीक्षा १० ते ११ मे २०२६ दरम्यान आयोजित केली जाणार आहे. या सर्व परीक्षा महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रांवर संगणकाधारित ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत.
यंदा दोन्ही संधींसाठी विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचेही दिसून आले आहे. पहिल्या संधीसाठी पीसीएम आणि पीसीबी समूहात एकूण ७ लाख ५५ हजार ०२९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर दुसऱ्या संधीसाठी ३ लाख ८७ हजार ५८१ विद्यार्थ्यांनी अर्ज भरला आहे. त्यामुळे या वर्षीची एमएचटी सीईटी परीक्षा मोठ्या प्रमाणावर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.






