फोटो सौजन्य - Social Media
गृह मंत्रालयाच्या अखत्यारीतील इंटेलिजन्स ब्युरो (IB) विभागाकडून 2025 साली सिक्युरिटी असिस्टंट (Motor Transport)/एक्झिक्युटिव्ह या पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 455 पदांसाठी अर्ज मागविण्यात आले असून, राष्ट्रीय सुरक्षेच्या क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. उमेदवारांनी अर्ज करताना संबंधित राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाचे डोमिसाईल प्रमाणपत्र तसेच स्थानिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
या भरतीसाठी उमेदवारांनी किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक असून, वाहन चालविण्याचा वैध परवाना (Driving License) आणि किमान 1 वर्षाचा अनुभव असावा. निवड प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षा, ड्रायव्हिंग/कौशल्य चाचणी, मुलाखत आणि वैद्यकीय तपासणी या टप्प्यांचा समावेश आहे. निवड झालेल्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार ₹21,700 ते ₹69,100 या दरम्यान वेतनश्रेणी मिळणार असून, विविध भत्त्यांचाही लाभ मिळेल. अर्ज प्रक्रिया 6 सप्टेंबर 2025 पासून सुरू झाली असून, 28 सप्टेंबर 2025 ही शेवटची तारीख आहे. परीक्षेचे आयोजन 30 ऑक्टोबर 2025 रोजी होणार आहे.
अर्ज शुल्क सामान्य, OBC आणि EWS प्रवर्गासाठी ₹650 असून, SC/ST आणि PWD उमेदवारांसाठी ₹550 इतके आहे. देयकाची पद्धत पूर्णपणे ऑनलाइन आहे. उमेदवारांचे वय 18 ते 27 वर्षे या दरम्यान असावे, तर शासनाच्या नियमानुसार आरक्षित प्रवर्गांना वयोमर्यादेत सूट दिली जाणार आहे. परीक्षा एकूण 100 गुणांची असून, एक तास कालावधीची असेल. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/4 गुण वजा केले जातील. प्रश्नपत्रिकेमध्ये सामान्य ज्ञान, ट्रान्सपोर्ट/ड्रायव्हिंग नियम, गणित, तर्कशक्ती आणि इंग्रजी या पाच विषयांचा समावेश असेल.
अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत अधिसूचना वाचावी आणि [mha.gov.in](https://www.mha.gov.in) किंवा [ncs.gov.in](https://www.ncs.gov.in) या संकेतस्थळांवर “Apply Online” या लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करून, शुल्क भरून अर्ज सबमिट करावा. शेवटी अर्जाची प्रिंट प्रत आपल्या नोंदीसाठी ठेवा. देशाच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडण्याची संधी देणारी ही भरती मेहनती, जबाबदार आणि राष्ट्रसेवेसाठी तत्पर असलेल्या तरुणांसाठी एक उत्तम संधी आहे, त्यामुळे इच्छुकांनी अर्ज करण्यास विलंब करू नये.