फोटो सौैजन्य - Social Media
भारतीय नौदलाने 10+2 (B.Tech) कॅडेट एंट्री योजनेअंतर्गत जानेवारी 2026 सत्रासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ही योजना कायमस्वरूपी आयोग (Permanent Commission) मिळवण्यासाठी एक उत्तम संधी आहे. या अंतर्गत कार्यकारी व तांत्रिक (Executive & Technical) शाखांमध्ये निवड होणार आहे. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (PCM) या विषयांसह 10+2 परीक्षा किमान 70% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी, तसेच 10वी किंवा 12वीमध्ये इंग्रजी विषयात किमान 50% गुण आवश्यक आहेत. तसेच उमेदवारांनी JEE (Main) 2025 परीक्षेला बसलेले असणे अनिवार्य आहे व त्यांच्या नावाचा All India Common Rank List (CRL) मध्ये समावेश असावा.
या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 30 जून 2025 पासून सुरू होणार असून 14 जुलै 2025 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. यामध्ये अर्जासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. सर्व श्रेणींतील (General/OBC/SC/ST/EWS/PWD/Female) उमेदवारांना मोफत अर्ज करता येणार आहे. वयोमर्यादेच्या बाबतीत उमेदवारांचा जन्म 2 जुलै 2006 ते 1 जानेवारी 2009 या कालावधीत झालेला असावा. शासनाच्या नियमानुसार सूट दिली जाईल.
एकूण 44 पदांसाठी ही भरती आहे. उमेदवारांची निवड JEE (Main) 2025 च्या CRL रँकनुसार होईल. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना SSB मुलाखतीसाठी बोलावले जाईल, जी बंगलोर, भोपाळ, कोलकाता किंवा विशाखापट्टणम येथे होईल. त्यानंतर वैद्यकीय तपासणी केली जाईल आणि शेवटी SSB मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल.
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी भारतीय नौदलाच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.joinindiannavy.gov.in) जाऊन ऑनलाईन अर्ज भरावा लागेल. अर्ज करताना पासपोर्ट साईझ फोटो, 10वी आणि 12वीच्या गुणपत्रिका तसेच JEE Main 2025 चा स्कोअरकार्ड (CRL) अपलोड करावा लागेल. फॉर्म भरल्यानंतर त्याची छापील प्रत भविष्यातील वापरासाठी जतन करून ठेवावी.
ही योजना भारतीय नौदलात अधिकारी म्हणून देशसेवेची संधी शोधणाऱ्या तरुण-तरुणींना उत्तम प्लॅटफॉर्म देते. चार वर्षांच्या B.Tech प्रशिक्षणानंतर त्यांना नौदलात कार्यकारी व तांत्रिक शाखांमध्ये कायमस्वरूपी नियुक्ती दिली जाईल.