फोटो सौैजन्य - Social Media
“अपयश म्हणजे शेवट नसतो, ती सुरुवात असते.” या वाक्याला सार्थ ठरवणारा आयपीएस अधिकारी म्हणजे उमेश गणपत खंडबहाळे. महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील महिरावाणी या छोट्याशा गावात जन्मलेला उमेश आज आयपीएस अधिकारी म्हणून कार्यरत आहे. पण या प्रवासामागे आहे कठोर परिश्रम, संघर्ष आणि अपयशांवर मात करून पुन्हा उठण्याची हिंमत.
उमेशचा जन्म एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे वडील दूध विक्री करून उदरनिर्वाह करायचे. उमेशही वडिलांना मदत म्हणून दूध गोळा करून नाशिकला विकायला जायचा. शिक्षणात फारसे यश नव्हते. १२वीत इंग्रजी विषयात तो नापास झाला होता. फक्त २१ गुण मिळवले होते. या अपयशाने त्याला खचवले नाही. तो दूध विकत राहिला, शेतीत मदत करत राहिला, पण मनाच्या कोपऱ्यात कुठे तरी शिक्षणाची जिद्द तग धरून होती. एक दिवस दूध विकताना उमेश यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या गेटजवळ थांबला. उत्सुकतेपोटी चौकशी केली आणि लगेच पुन्हा १२वीत प्रवेश घेतला. २००५ मध्ये त्याने १२वी उत्तीर्ण केली. त्यानंतर त्याने बीए, बीएड आणि इंग्रजीत एमए केलं, ज्याच्यात तो कधी नापास झाला होता, तेच त्याने आपलं सामर्थ्य बनवलं.
या दरम्यान त्याने बागायती शिक्षणाचाही अभ्यास केला. एकदा कुणाकडून यूपीएससी परीक्षेबद्दल कळालं. सुरुवातीला काही महिने मूळ संकल्पना समजून घेतल्या आणि नंतर तो दिल्लीला अभ्यासासाठी गेला. पण यश लगेच मिळालं नाही. २०१२ आणि २०१३ या दोन्ही वर्षी तो अपयशी ठरला. मात्र जिद्द सोडली नाही. २०१४ मध्ये तिसऱ्यांदा प्रयत्न केला आणि अखेर ऑल इंडिया रँक 704 मिळवून उमेश खंडबहाळे यांची आयपीएस म्हणून निवड झाली.
आज उमेश पश्चिम बंगाल कॅडरमध्ये आयपीएस अधिकारी आहेत. आपल्या गावातून आयपीएस होणारा तो पहिलाच तरुण ठरला. ‘12th फेल’ चित्रपट पाहिल्यावर त्यानेही स्वतःचा संघर्ष आठवला. त्याचं म्हणणं आहे, “रीस्टार्ट म्हणजेच जिवंतपणा. कितीही अपयश येऊ देत, माणूस पुन्हा सुरूवात करू शकतो.” उमेश खंडबहाळे यांची कहाणी प्रत्येक त्या विद्यार्थ्यासाठी प्रेरणादायक आहे, ज्याला अपयशाने घेरले आहे. शिक्षणात एकदा नापास झालं म्हणून आयुष्य संपत नाही, तर ते पुन्हा उभं राहण्याची संधी बनतं. हे उमेशने कृतीतून सिद्ध केलं आहे.