नेरळ येथील LAES शाळेच्या वार्षिक स्नेह संमेलनात एआयचे माध्यमातून आलेल्या रोबोटने विविध गोष्टींचा उलगडा केला. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञान यांचा वापर असलेले प्रचंड गाजले.दरम्यान छत्रपती संभाजी महाराज यांचा गणवेश घालून आलेले महाराज प्रेक्षकांच्या गर्दीतून आल्यानंतर ऐन थंडीत गारठलेले नेरळकर बेभान झाल्याचे दिसून आले.
लॉर्ड आयप्पा एज्युकेशन सोसायटीच्या नेरळ येथील LAES इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज यांचे वार्षिक स्नेह संमेलन नेरळ गावातील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात आयोजित करण्यात आले होते. यावेळी संस्थेच्या संचालिका संचालक संगिता नायर, श्रीकुमार नायर,मुख्याध्यापिका, अजिता नायर तसेच स्मिता नायर आणि संध्या नायर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शिंदे गटाच्या युवासेनेचे जिल्हा युवा अधिकारी प्रसाद थोरवे तसेच रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे माजी सदस्य सावळाराम जाधव आदी उपस्थित होते.
शाळेने दरवर्षी आपल्या दहावी आणि बारावीमध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना आणि त्यांचे पालकांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्याची प्रथा निर्माण केली आहे.31 व्या वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रमाचे प्रास्ताविक आशा कांबळे, रवी भोईर आणि सुशीला आचारी यांनी केले. यावेळी राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा तसेच यावर्षी कर्जत विज्ञान प्रदर्शनात कर्जत तालुक्यात पहिला आलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
वार्षिक गुणगौरव नंतर सादर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमावर ए आय चे वर्चस्व दिसून आले. विविध विषयांवर ए आय निर्मित रोबोटकडून माहिती देण्यात आली.तर ए आय ने सर्व सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करून घेतले. त्यात गगेशवंदना,बाईपण भारी, तारक मेहता,डोंबारी,अल्लदिन,लेडी सिंघम,महालक्ष्मी, कांतारा, गरबा,सावित्रीबाई फुले,ललाटी भंडार,डिजिटल इंडिया आणि छत्रपती शिवाजी महाराज तसेच काकोरी हत्याकांडवरील नाटिका यांनी विशेष लक्ष वेधले.पण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित नाटिका सादर होत असताना प्रेक्षकांच्या गर्दीतून वाट काढत आलेले छत्रपती संभाजी महाराज यांच्या एन्ट्री सर्व आवक झाले. शंभूराजेंवर केलेल्या सादरीकरणाला विद्यार्थी आणि पालकांनी उदंड प्रतिसाद दिला.






