फोटो सौजन्य - Social Media
महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड (महाजेनको) ने विविध पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही उत्तम संधी असून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीअंतर्गत कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ, अतिरिक्त कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ, उप कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ, सहाय्यक रसायनशास्त्रज्ञ आणि कनिष्ठ रसायनशास्त्रज्ञ अशा एकूण 173 जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये कार्यकारी रसायनशास्त्रज्ञच्या 3, अतिरिक्त कार्यकारी रसायनशास्त्रज्ञच्या 19, उप कार्यकारी रसायनशास्त्रज्ञच्या 27, सहाय्यक रसायनशास्त्रज्ञच्या 75 आणि कनिष्ठ रसायनशास्त्रज्ञच्या 49 जागांचा समावेश आहे.
या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा पदानुसार वेगवेगळी आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. उमेदवारांनी संबंधित विषयात आवश्यक शैक्षणिक पात्रता मिळवलेली असणे गरजेचे आहे. तसेच, वयोमर्यादा आणि आरक्षित प्रवर्गासाठी असलेल्या सवलतींबाबतची अधिक माहिती महाजेनकोच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी महाजेनकोच्या अधिकृत संकेतस्थळाला (www.mahagenco.in) भेट द्यावी. संकेतस्थळावर गेल्यानंतर भरतीच्या लिंकवर क्लिक करून आवश्यक माहिती भरावी. नवीन उमेदवारांनी प्रथम नोंदणी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे, त्यानंतर लॉगिन करून अर्ज भरता येईल. अर्ज भरताना उमेदवारांनी सर्व आवश्यक माहिती अचूकपणे भरावी आणि कोणतीही चूक होणार नाही याची खात्री करावी. अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शुल्क भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे. कागदपत्रांमध्ये उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र, ओळखपत्र, छायाचित्र आणि स्वाक्षरी यासारख्या महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश असतो. अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंटआउट काढून ठेवण्याचा सल्ला दिला जातो, जेणेकरून भविष्यात आवश्यकतेनुसार त्याचा उपयोग करता येईल.
महाजेनको भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 12 फेब्रुवारी 2025 पासून सुरू झाली असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 मार्च 2025 आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या क्षणाची वाट न पाहता वेळेपूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. अर्ज प्रक्रियेमध्ये तांत्रिक समस्या येण्याची शक्यता असते, त्यामुळे उमेदवारांनी शेवटच्या दिवशी अर्ज करण्याचा धोका घेऊ नये. महाजेनको ही महाराष्ट्रातील प्रमुख ऊर्जा उत्पादक कंपनी असून, येथे नोकरी मिळवणे उमेदवारांसाठी स्थिर व उज्ज्वल करिअरची संधी ठरू शकते. कंपनीमध्ये आकर्षक वेतन, उत्तम सुविधा आणि सरकारी नोकरीचे फायदे मिळतात, त्यामुळे दरवर्षी मोठ्या संख्येने उमेदवार अर्ज करतात. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि आवश्यक पात्रता व अटी पूर्ण झाल्यास योग्य वेळी अर्ज करावा.