फोटो सौजन्य - Social Media
महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टी असोसिएशन (मेस्ता) यांच्याकडून दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘बेस्ट स्कूल अवॉर्ड’ सलग तिसऱ्या वर्षी जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्स आणि गुंजकर कॉलेज, खामगाव यांना प्रदान करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा सन्मान मिळवणारी ही जिल्ह्यातील एकमेव इंग्रजी माध्यमाची शाळा ठरली आहे. शैक्षणिक क्षेत्रात सातत्यपूर्ण गुणवत्ता, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या प्रयत्नांची ही महत्त्वपूर्ण दखल मानली जात आहे.
जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्सची स्थापना सन २०१७ मध्ये एका छोट्याशा आवारात करण्यात आली होती. सुरुवातीला मर्यादित सुविधा आणि कमी विद्यार्थ्यांपासून सुरू झालेल्या या शाळेने अल्पावधीतच शिक्षण क्षेत्रात स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. गुणवत्तापूर्ण अध्यापन, शिस्तबद्ध वातावरण आणि आधुनिक शिक्षणपद्धती यामुळे शाळेने पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा विश्वास संपादन केला आहे. आज ही संस्था केवळ शाळा न राहता विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचे केंद्र बनली आहे.
विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी शाळेत दरवर्षी ‘अविष्कार’ क्रीडा महोत्सव आयोजित केला जातो. खेळ, कला, सांस्कृतिक उपक्रम यांना अभ्यासाइतकेच महत्त्व दिले जाते. यासोबतच विद्यार्थ्यांची स्पर्धात्मक परीक्षांसाठी तयारी व्हावी, यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. NEET, JEE यांसारख्या परीक्षांमध्ये विद्यार्थी मागे राहू नयेत आणि भविष्यात डॉक्टर, अभियंते, संशोधक घडावेत, या उद्देशाने उच्च शैक्षणिक पात्रता असलेले अनुभवी शिक्षक नियुक्त करण्यात आले आहेत.
नियमित अभ्यासक्रमासोबतच सायन्स फाउंडेशनचा अभ्यासक्रम राबवणारी जिल्ह्यातील ही एकमेव इंग्रजी शाळा असल्याची नोंद शिक्षण विभागानेही घेतली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना लवकरच वैज्ञानिक दृष्टिकोन, तर्कशक्ती आणि संकल्पनात्मक समज विकसित करण्याची संधी मिळते. स्मार्ट क्लासरूम्स, प्रॅक्टिकल-आधारित शिक्षण, प्रयोगशील अध्यापन पद्धती यामुळे विद्यार्थी केवळ गुण मिळवणारे नव्हे, तर आत्मविश्वासपूर्ण आणि विचारशील नागरिक घडत आहेत.
शाळेत सातत्याने नवकल्पना राबवण्यासाठी शिक्षक, प्राचार्य आणि व्यवस्थापन यांचे समन्वयाने प्रयत्न सुरू असतात. शिक्षक प्रशिक्षण, अभ्यासक्रम नियोजन आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा सातत्याने आढावा घेतला जातो. याच एकत्रित प्रयत्नांचा परिणाम म्हणून २०२४, २०२५ आणि २०२६ या सलग तीन वर्षांत जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्स आणि गुंजकर कॉलेजला ‘बेस्ट स्कूल अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले आहे. हा सन्मान संस्थेसह सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. भविष्यात याहीपेक्षा अधिक गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडवणे, त्यांना विविध क्षेत्रांत प्राविण्य मिळवून देणे आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाजाच्या विकासात योगदान देणे, असा दृढ संकल्प संस्थेने व्यक्त केला आहे.






