(फोटो- istockphoto)
पुणे: महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालनालय, पुणे अंतर्गत इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रिया २०२५-२६ साठी नियमित फेरी-२चे वेळापत्रक जाहीर झाले असून, १० जुलै २०२५ पासून ही फेरी सुरू होत आहे. यामध्ये विद्यार्थी नवीन नोंदणी करू शकतात किंवा अर्जाच्या भाग-१ मध्ये आवश्यक दुरुस्ती करू शकतात. या फेरीत विद्यार्थी १ ते १० पर्यंतच्या प्राधान्यक्रमानुसार उच्च माध्यमिक विद्यालयांची निवड करू शकतात.
या फेरीमध्ये नियमित फेरी-१ मध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंती आणि प्रवाहात बदल करण्याची संधी दिली जाणार आहे. अर्ज भरून सुधारणा करण्याची अंतिम मुदत १३ जुलै २०२५ सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे.
१७ जुलै २०२५ रोजी विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिनमध्ये कॉलेज वाटपाची माहिती मिळणार असून, SMS द्वारे देखील त्यांना याची सूचना दिली जाणार आहे. त्यानंतर, १८ जुलै ते २१ जुलै २०२५ दरम्यान विद्यार्थ्यांनी संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश निश्चित करणे गरजेचे आहे. याच कालावधीत विद्यालयांनी कोटानिहाय गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे.
२३ जुलै २०२५ रोजी रिक्त जागांची माहिती प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर कोटांतर्गत पात्र विद्यार्थ्यांना संपर्क साधून त्यांच्या प्रवेशासंदर्भात कार्यवाही पूर्ण केली जाईल.
संपूर्ण प्रक्रिया वेळापत्रकानुसार पार पाडणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी, पालकांनी व विद्यालयांनी प्रत्येक टप्प्याचे वेळेत पालन करून प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी केले आहे.
पुणे विभागातील ७ जुलै अखेर प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या
पुणे जिल्हा – ४५५०५
सोलापूर जिल्हा – २०६३१
अहिल्यानगर जिल्हा -२४६८७
एकूण पुणे विभाग -९०८२३
अकरावी प्रथम फेरीअंतर्गत प्रवेशाकरिता शेवटचे दोन दिवस बाकी