फोटो सौजन्य - Social Media
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून मंत्रालय स्तरावर राबविण्यात आलेल्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेत महिला व बालविकास विभागाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मंत्री आदिती तटकरे आणि सचिव डॉ. अनुपकुमार यादव यांचा गौरव करण्यात आला.
ही मोहीम नागरिक आणि शासन यांच्यातील विश्वास वाढवण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरली आहे. राज्यातील १२,५०० कार्यालयांमध्ये या उपक्रमांतर्गत सुधारणा करण्यात आल्या. महिला व बालविकास विभागाने आपले संकेतस्थळ युजर फ्रेंडली बनवले असून त्यावर योजनांची माहिती मराठी व इंग्रजीत उपलब्ध आहे.
राज्यातील हजारो अंगणवाड्यांमध्ये विविध सुविधा पुरवण्यात आल्या. १३ हजार ११ मिनी अंगणवाड्यांमध्ये पायाभूत सुविधा सुधारल्या गेल्या, तर ९ हजारांहून अधिक ठिकाणी शौचालयांची कामे सुरू आहेत. ३४५ अंगणवाड्यांमध्ये पाळणाघर सुरू करण्याचे काम सुरू आहे. ३३ हजार कर्मचाऱ्यांना पोषण व अन्न मापदंड प्रशिक्षण देण्यात आले. ‘पोषण भी पढाई भी’ कार्यक्रमांतर्गत ३७ हजार अंगणवाड्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले. पोषण ट्रॅकर प्रणालीवर १०० टक्के ग्रोथ मॉनिटरिंगची नोंद करण्यात आली.
‘पोषण माह’ आणि ‘पोषण पखवाडा’ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र देशात आघाडीवर राहिला आहे. विमा योजनांतर्गत हजारो अंगणवाडी कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण देण्यात आले. १७ हजारांहून अधिक केंद्रांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात आले असून, १३ हजार ५९५ अंगणवाड्यांचे सक्षम केंद्रांमध्ये रूपांतर करण्यात आले आहे.
राज्यात ५३७ बालकांना दत्तक देण्यात आले असून, बालविवाह रोखण्याच्या मोहिमेत ३३१ बालविवाह थांबवण्यात आले. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत पावर बी डॅशबोर्डचा वापर करण्यात आला. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून २० लाख महिलांना मदत मिळत आहे. कार्यालयीन कामात ई-ऑफिस, न्यायालयीन प्रकरणांमध्ये तातडीचा निपटारा, प्रसाधनगृह, पिण्याचे पाणी, हिरकणी कक्ष, आणि कार्यालयाचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. या सर्व उपाययोजनांमुळे महिला व बालविकास विभाग राज्यात अव्वल ठरला आहे.