महाराष्ट्र शासनाने राबविलेल्या प्रशासकीय सुधारणा उपक्रमांतर्गत मुंबई विद्यापीठाने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. राज्यातील एकूण १३ अकृषी विद्यापीठांपैकी मुंबई विद्यापीठाने १५० दिवसांच्या ‘सेवाकर्मी प्लस’ कार्यक्रमात सर्वाधिक ८० गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने विविध शासकीय कार्यालये, संस्था आणि विद्यापीठांची प्रशासकीय कामगिरीनुसार क्रमवारी जाहीर केली असून, त्यामध्ये मुंबई विद्यापीठाने आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.
Padma Awards 2026 List: साहित्य व शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांना पद्म पुरस्कारांची घोषणा!
‘विकसित महाराष्ट्र २०४७’ या संकल्पनेच्या दिशेने वाटचाल करताना पारदर्शक, गतिमान आणि उत्तरदायी सुशासन निर्माण करण्यासाठी राज्य शासनाकडून प्रशासकीय सुधारणा राबविल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून विविध प्रशासकीय विभागांच्या अधिपत्याखालील मंडळे, महामंडळे, प्राधिकरणे, विद्यापीठे, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, आयोग आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक कामकाजाचे मूल्यांकन करण्यासाठी १५० दिवसांचा ‘सेवाकर्मी प्लस’ कार्यक्रम राबविण्यात आला होता.
या कार्यक्रमाअंतर्गत मुंबई विद्यापीठाने शासनाने निश्चित केलेल्या एकूण ९ महत्त्वाच्या निकषांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. यामध्ये आकृतीबंध निश्चिती, सेवाप्रवेश नियमांची अंमलबजावणी, सर्व संवर्गांची अद्ययावत ज्येष्ठतासूची प्रसिद्ध करणे, पदोन्नतीने नियुक्तीची स्थिती, सरळसेवा नियुक्तीतील रिक्त पदांची माहिती, बिंदू नामावलीचे प्रमाणीकरण, अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्या, आयजीओटी (iGOT) नोंदणी व प्रशिक्षण, तसेच सर्व कर्मचाऱ्यांची सेवापुस्तके अद्ययावत व डिजिटल स्वरूपात रूपांतरित करणे या बाबींचा समावेश होता. या सर्व निकषांवर मुंबई विद्यापीठाने प्रभावी अंमलबजावणी करत १०० पैकी ८० गुण प्राप्त केले.
UGC Bill Row : “मी तुम्हाला खात्री देतो की कोणाबरोबरही भेदभाव केला जाणार नाही,” UGC वादावर शिक्षण मंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया
६ मे ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील सर्व अकृषी विद्यापीठांमध्ये हा कार्यक्रम राबविण्यात आला. मुंबई विद्यापीठात हा उपक्रम कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे आणि कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे राबविण्यात आला. विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने मानव संसाधन विकास विभागाचे उपकुलसचिव डॉ. अशोक फर्डे आणि त्यांच्या टीमने या उद्दिष्टपूर्तीसाठी विशेष परिश्रम घेतले. प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता, वेग आणि जबाबदारी वाढवण्यासाठी करण्यात आलेल्या या प्रयत्नांचे राज्य शासनाकडून कौतुक करण्यात आले असून, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रशासकीय विभागांचा लवकरच सन्मान करण्यात येणार असल्याचेही शासनाने स्पष्ट केले आहे. या यशामुळे मुंबई विद्यापीठाने केवळ शैक्षणिकच नव्हे, तर प्रशासकीय गुणवत्तेतही आपले नेतृत्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.













