फोटो सौजन्य - Social Media
प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी केंद्र सरकारने पद्म पुरस्कार २०२६ यांची अधिकृत घोषणा केली आहे. यंदा देशातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या एकूण १३१ प्रतिष्ठित व्यक्तींना भारताच्या सर्वोच्च नागरी सन्मानांनी गौरवण्यात येणार आहे. या पुरस्कारांमध्ये पद्म विभूषण, पद्म भूषण आणि पद्म श्री या तीन श्रेणींचा समावेश आहे. घोषणेनुसार, यंदा ५ व्यक्तींना पद्म विभूषण, १३ जणांना पद्म भूषण, तर ११३ मान्यवरांना पद्म श्री पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. कला, साहित्य, शिक्षण, समाजसेवा, विज्ञान, क्रीडा, वैद्यकीय सेवा आणि इतर विविध क्षेत्रांत देशासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाची दखल म्हणून हे पुरस्कार दिले जातात.
साहित्य आणि शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अनेक मान्यवरांना यंदा पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. केरळचे पी. नारायणन यांना त्यांच्या दीर्घकालीन आणि अपवादात्मक सेवेसाठी पद्म विभूषण प्रदान करण्यात येणार आहे. पद्मश्री पुरस्कारासाठी निवड झालेल्या मान्यवरांमध्ये पश्चिम बंगालचे अशोक कुमार हलदर, गंभीर सिंग योन्झोन, महेंद्र नाथ रॉय आणि रबिलाल तुडू यांचा समावेश आहे. ओडिशातील चरण हेम्ब्रम आणि महेंद्र कुमार मिश्रा यांनाही पद्मश्री जाहीर झाला आहे.
मध्य प्रदेशचे कैलाश चंद्र पंत, दिल्लीचे ममिदला जगदीश कुमार, उत्तर प्रदेशच्या सुश्री मंगला कपूर, त्रिपुराचे नरेश चंद्र देव वर्मा, तसेच गुजरातचे रतिलाल बोरीसागर यांनाही साहित्य व शिक्षण क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. दक्षिण भारतातून कर्नाटकचे डॉ. प्रभाकर बसवप्रभू कोरे आणि शशी शेखर वेमपट्टी, तर तामिळनाडूच्या कु. शिवशंकरी यांना हा सन्मान मिळाला आहे. जम्मू-काश्मीरमधील प्रा. शफी शौक यांनाही पद्मश्री पुरस्कार देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय पातळीवर साहित्य व शिक्षण क्षेत्रात योगदान देणाऱ्या रशियाच्या सुश्री ल्यूडमिला विक्टोरोव्हना खोखलोवा यांनाही पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
पद्म पुरस्कार हे भारत सरकारकडून दिले जाणारे अत्यंत प्रतिष्ठेचे नागरी सन्मान आहेत. देशाच्या प्रगतीसाठी आपल्या कार्यक्षेत्रात असाधारण योगदान देणाऱ्या व्यक्तींना हे पुरस्कार दिले जातात.






