१२ डिसेंबर हा दिवस ‘राष्ट्रीय छात्र सेना’ (NCC ) दिवसाचे औचित्य साधून साठये महाविद्यालय आणि पार्ले टिळक विद्यालयाच्या विद्यार्थांनी हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला. शिस्तबद्ध पद्धतीने कवायती, प्रात्याक्षिके आणि त्यासोबत सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन यामध्ये करण्यात आले.साठये महाविद्यालयाच्या नौदल आणि वायुदलाचे विद्यार्थी आणि सहकारी यांचा देखील या कार्यक्रमात सहभाग होता. यासोबतच डिफेन्स स्टडीज विभागातर्फे सैनिकी उपकरणांचे प्रदर्शन देखील भरवण्यात आले होते.
या कार्यक्रमाला ८ महाराष्ट्र बटालियनचे कमान अधिकारी कर्नल नवीन शर्मा, ३ महाराष्ट्र बटालियनचे प्रसाकीय अधिकारी कर्नल प्रखर सिन्हा यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांचे स्वागत पार्ले टिळक असोसिएशन संस्थेचे अध्यक्ष अनिल गानू आणि उपाध्यक्ष विनय जोग यांनी केले.साठये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव राजवाडे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत ३ वर्षांच्या डिफेन्स स्टडी या अभ्यासक्रमाबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच ‘देशभक्ती आणि संरक्षण दलात’ जाण्यासाठी असे कार्यक्रम प्रेरणादायी ठरतात,त्यामुळे अशा कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी हिरिरीने सहभाग घ्यावा असे आवाहन केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ. कॅप्टन गौरांग राजवाडकर आणि लेफ्टनंट कस्तुरी मेढेकर यांचे मार्गदर्शन वेळोवेळी विद्यार्थ्यांना लाभले. फर्स्ट ऑफिसर उमेश शिंदे तसेच पार्ले टिळक असोसिएशन संस्थेशी निगडीत सर्व प्राचार्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून प्रोत्साहन दिले. पार्ले टिळक शाळा आणि साठये महाविद्यालयाचे ३०० विद्यार्थ्यांच्या समवेत हा कार्यक्रम संपन्न झाला.
राष्ट्रीय छात्र सेना दिवस
राष्ट्रीय छात्र सेनेची (एनसीसी) स्थापना ही 1948 मध्ये झाली. एनसीसी ही जगातील सर्वात मोठी गणवेशधारी संघटना आहे. ही संघटना तरुण-तरुणींमध्ये शिस्त, नेतृत्व आणि राष्ट्रवादासारख्या महत्त्वाच्या मूल्यांचा सन्मान करण्याची परंपरा कायम ठेवत आहे आणि संस्मरणीय कार्य करत आहे. एनसीसी ही 75 हून जास्त वर्षे युवकांना घडणवारी एक महत्वाची संघटना आहे. देशातील सर्व बहुतेक शाळा व महाविद्यालयांमधून ही योजना राबवली जाते.
एनसीसीचे उद्दिष्ट
१९८८ मध्ये मांडण्यात आलेले एनसीसीचे ‘उद्दिष्ट’ काळाच्या कसोटीवर उतरले आहेत आणि देशाच्या सध्याच्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीत अपेक्षित असलेल्या महत्त्वाच्या गरजा पूर्ण करत आहेत. एनसीसीचे उद्दिष्ट तरुण नागरिकांमध्ये चारित्र्य, सहवास, शिस्त, धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन, साहसाची भावना आणि निःस्वार्थ सेवेचे आदर्श विकसित करणे आहे. शिवाय, जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये नेतृत्वगुण असलेले संघटित, प्रशिक्षित आणि प्रेरित तरुणांचा समूह तयार करणे आहे, जे विद्यार्थ्यांनी कोणतेही करिअर निवडले तरीही राष्ट्राची सेवा करतील. हे सांगण्याची गरज नाही की एनसीसी तरुण भारतीयांना सशस्त्र दलात सामील होण्यासाठी प्रेरित करण्यासाठी अनुकूल वातावरण देखील प्रदान करत आहे.
भारत-पाक युध्दात NCC छात्रांचे योगदान
1965 आणि 1971 मध्ये भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध झाले. त्यावेळी NCC छात्रांनी प्रत्यक्ष युध्दात सहभाग घेत मोलाची कामगिरी केली होती. एनसीसी छात्रांनी सैनिकांना हत्यार आणि गोळाबारुद पुरविणे, शस्त्रास्त्र निर्मितीमध्ये मदत करणे, शत्रूंच्या पॅराटूपर्सवर कब्जा करणे आणि शहरामध्ये गस्त घालण्याचे कार्य चोख बजावले होते.