फोटो सौजन्य - Social Media
राज्यातील जिल्हा परिषद, नगर परिषद व खासगी अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांचे पालक आता आपल्या पाल्यांची शैक्षणिक प्रगती मोबाईलद्वारे सहज तपासू शकतील. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (SCERT) ‘निपुण महाराष्ट्र एससीईआरटीएम’ नावाचे नवीन अॅप तयार केले आहे. या अँपचे वापर येत्या शैक्षणिक वर्षात करण्यात येईल.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणात पालकांचा सक्रिय सहभाग वाढवण्यासाठी हे अॅप विकसित करण्यात आले आहे. शिक्षकांनी केलेल्या मेहनतीस पालकांच्या पाठिंब्याची जोड मिळावी व शैक्षणिक सूचना प्रभावीपणे पोहोचाव्यात, हा या अॅपचा मुख्य हेतू आहे. ‘निपुण भारत’ उपक्रमांतर्गत महाराष्ट्रात शिक्षणाच्या दर्जात सुधारणा करण्यासाठी हे एक पाऊल ठरणार आहे. एप्रिल 2025 मध्ये कोल्हापूर जिल्ह्यात या अॅपचा प्रायोगिक वापर यशस्वीपणे पार पडला. अमरावती जिल्ह्यातही अंगणवाड्यांपासून आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे अध्ययन स्तर निश्चित करण्यात आले.
या अॅपमध्ये पालकांना अॅप वापरण्याबाबत मार्गदर्शन करणारे व्हिडिओ सुद्धा उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या व्हिडिओंच्या माध्यमातून पालकांना अॅपच्या विविध सुविधा, लॉगिन प्रक्रिया, विद्यार्थ्यांची प्रगती कशी पाहावी, तसेच घरबसल्या सराव कसा घ्यावा याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाशी कमी परिचय असलेले पालक सुद्धा अॅप सहजपणे वापरू शकतील. यासोबतच, स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी अनुदानित शाळांतील शिक्षकांना प्रत्येक वर्गासाठी पालकांचे मोबाईल क्रमांक अद्ययावत करून नोंदवण्याचे निर्देश शिक्षण आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आले आहेत, जेणेकरून अॅपच्या माध्यमातून सर्व पालकांपर्यंत वेळेवर व अचूक माहिती पोहोचू शकेल.
या अॅपमध्ये पालकांना मार्गदर्शन करणारे व्हिडिओही उपलब्ध असतील जे त्यांना अॅप वापरण्यास सुलभ ठरतील. सध्या शाळांना वर्गनिहाय पालकांचे मोबाईल क्रमांक अद्ययावत करण्यास सांगण्यात आले आहे. येत्या काळात शाळांमधील विविध उपक्रम, उत्सव आणि सूचना या अॅपमधून थेट पालकांपर्यंत पोहोचणार आहेत. डिजिटल शिक्षणाच्या दिशेने महाराष्ट्र शासनाचा हा महत्त्वपूर्ण टप्पा असून, ‘निपुण महाराष्ट्र एससीईआरटीएम’ अॅपमुळे शालेय शिक्षण अधिक सुलभ व तंत्रस्नेही होणार आहे.