फोटो सौजन्य- नवराष्ट्र प्रतिनिधी
कल्याण : बि. के. बिर्ला महाविद्यालय कल्याण, राष्ट्रीय वृक्ष मित्र मंडळ कल्याण शाखा, केडीएमसी आणि सेन्चुरी रेयॉन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वृक्ष दिंडी’ चे आयोजन करण्यात आले. हि वृक्ष दिंडी इंदिरा नगर – संतोषी माता रोड – सहजानंद चौक – शिवाजी चौक – केडीएमसी अशी काढण्यात आली. या उपक्रमात कल्याण नगरीतील ८ शाळा आणि २० महाविद्यालयातील सुमारे १६०० विद्यार्थीं ज्यात राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना व इतर विद्यार्थीं सहभागी झाले होते.
३३ वर्षे अविरत वृक्ष दिंडी
या उपक्रमाची सुरुवात १९९१ पासून कै. रामभाऊ कापसे, कै. सीताराम पै, कै. जे. के. पाठारे आणि डॉ. नरेश चंद्र निर्देशक (बि .के. बिर्ला महाविद्यालय) यांच्या संकल्पनेतून आकारास आली. कल्याण शहरात सुरु झालेलं शहरीकरण आणि निसर्ग याचा समतोल घडवून आणण्यासाठी आणि नागरिकांनी निसर्गाचं उत्तम रित्या संगोपन करण्यासाठी वृक्ष दिंडी आयोजन केले जाते. या वृक्षदिंडीचे आयोजन गेली ३३ वर्ष कल्याण शहरात बिर्ला महाविद्यालयाकडून अविरत केले जात आहे. आजच्या काळात विशेषत: शहरामध्ये वृक्ष लागवडीची आवश्यकता आहे. ज्यामुळे आपल्या शहरातील प्रदुषित वातावरण कमी करता येईल
वृक्षदिंडीचे प्रमुख पाहुणे
बिर्ला महाविद्यालय आणि इतर संस्थांच्या सयुक्त वृक्ष दिंडीत प्रमुख पाहुणे म्हणून घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त अतुल पाटील, मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव, एस. एस. देशमुख उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बिर्ला महाविद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. सर्व विद्यार्थी वर्गाने निसर्ग संवर्धन, झाडांची लागवड व त्यांची काळजी, नैसर्गिक उत्पत्ती या प्रकारचे संदेश देणारे फलक तयार केले होते. या फलकांमुळे नागरिंकामध्ये जनजागृती केली गेली. . वातावरणाचा समतोल केवळ झांडांमुळेच राखला जातो त्यामुळे अशा वृक्षदिंडी महत्वाच्या असतात. या वृक्षदिंडीत असणाऱ्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग असल्याने युवापिढीलाही निसर्ग संवर्धनाचे महत्व कळते.
या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष ओमप्रकश चितलांगे, उपाध्यक्ष सुबोध दवे, बि. के. बिर्ला महाविद्यालयाचे निर्देशक डॉ. नरेश चंद्र, प्राचार्य डॉ. अविनाश पाटील, डॉ. वाडेकर, प्राचार्य, रात्र महाविद्यालय, डॉ. महादेव यादव उप प्राचार्य, डॉ. हरीश दुबे उप प्राचार्य यांचे मार्गदर्शन लाभले. ह्या वृक्ष दिंडीचे संयोजन डॉ. संदेश जायभाए यांनी केले.