मुदतपूर्व प्रसूती झाल्यावर बाळाची कशी घेतली काळजी (फोटो सौजन्य - iStock)
100 दिवस केले उपाय
‘एनआयसीयू ऑन व्हील्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एनआयसीयूच्या वाहतूक पथकाने नवजात शिशु रुग्णवाहिकेतून या अकाली जन्मलेल्या बाळाला सुरक्षितरित्या रुग्णालयात पोहोचविले. १०० दिवस एनआयसीयुमध्ये उपचार घेतल्यानंतर ३७ आठवड्यांच्या या बाळाचे वजन २.२ किलोपर्यंत वाढले. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर तसेच स्तनपान करु लागल्यानंतर या बाळाला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. रीमा मिश्रा (३३,) आणि तिचे पती कमल मिश्रा (३७,) (नावे बदलली आहेत)यांचा पालकत्वाचा पहिलाच अनुभव होता आणि आपल्या बाळाची ते आतुरतेने वाट पाहत होते. मात्र अचानक संध्याकाळी, रीमाला असामान्य अशी अस्वस्थता जाणवली आणि काही तासांतच तिची गर्भजल पिशवी फुटली. तिला यापूर्वी कोणताही आजार नव्हता, थायरॉईड किंवा मधुमेहाची कोणतीही समस्या नव्हती आणि तिची आतापर्यंतची प्रसूतिपूर्व तपासणी सामान्य होती, ज्यामुळे तिला प्रसूती संदर्भात कोणताही धोका नव्हता.
वेदनेने त्रस्त असलेल्या रीमाला जवळच्या खाजगी रुग्णालयात नेले. तपासणीनंतर, रीमाला गर्भधारणेच्या केवळ २३ आठवड्यांतच अकाली प्रसूती वेदना सुरू झाल्या होत्या. तिची प्रकृती बिघडत चालली होती म्हणून वेळ न दवडता तिची योनीमार्गे प्रसूती करण्यात आली.जन्माच्या वेळी बाळाचे वजन केवळ ५५० ग्रॅम इतके होते. अकाली जन्मल्यामुळे बाळाला तातडीने विशेष नवजात शिशु तज्ज्ञांच्या देखरेखीखाली उपचारांची आवश्यकता होती.
काय सांगतात तज्ज्ञ
नवजात शिशु तज्ज्ञ डॉ. प्रशांत रामटेककर म्हणाले,जेव्हा आम्हाला या प्रकरणाची माहिती दिली तेव्हा आम्हाला माहित होते की या बाळाला तातडीने आणि प्रगत वैद्यकीय मदतीची गरज आहे. २३ आठवड्यांत जन्मलेली आणि ६०० ग्रॅमपेक्षा कमी वजन असलेले बाळ हे ‘मायक्रो-प्रीमी’ म्हणून ओळखली जातात आणि त्यांना श्वसनासंबंधी अडथळा येतो. मेंदूत अंतर्गत रक्तस्त्राव, जंतू संसर्ग आणि दूध न पचणे यांसारख्या धोक्यांचा सामना करावा लागतो. आमच्या ‘एनआयसीयू ऑन व्हील्स’ पथकाने वेळेत रुग्णालयात पोहोचून या नवजात बाळाची प्रकृती स्थिर केली. डॉ. प्रशांत पुढे सांगतात की, बाळाची फुफ्फुसं अविकसित होती, त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता आणि जन्माच्या पहिल्या मिनिटापासूनच त्याला व्हेंटिलेटर सपोर्टची गरज होती.
बाळाला सात दिवस व्हेंटिलेशनवर ठेवण्यात आले, त्यानंतर त्याला नॉन-इन्व्हेसिव्ह सपोर्टवर हलवण्यात आले. त्यानंतर बाळाला जंतू संसर्ग झाला आणि यामुळे त्याच्या रक्त गोठण्याच्या पक्रियेत व्यत्यय येत होता आणि परिस्थिती खूपच गंभीर झाली होती. अशावेळी बाळांवर उपचार करणे हे अत्यंत आव्हानात्मक असते कारण प्रत्येक अवयव अपरिपक्व असतो. आम्ही पीडीए (Patent ductus arteriosus) सारख्या हृदयाच्या समस्या टाळण्यासाठी काळजीपूर्वक व्यवस्थापन केले, मेंदूच्या तपासणी केली, दृष्टी आणि श्रवणशक्तीचा विकास सुनिश्चित केला.
वेळेच्या अगोदरच होतेय गर्भधारणा! भारतात हा प्रकार वाढीस का? जाणून घ्या
बाळाचा कसा केला सांभाळ?
बाळाला सुरुवातीला संपूर्ण पॅरेंटरल पोषण (शिरेवाटे) देण्यात आले आणि नंतर फीडिंग ट्यूबद्वारे आईचे दुध दिले. हळूहळू बाळ दूध पचवू लागल्यावर आम्ही त्याचे दूधाचे प्रमाण वाढवले. कांगारू मदर केअर सुरू करण्यात आले, ज्यामुळे बाळाला पालकांशी नाते निर्माण करण्यास आणि शारीरिक व भावनिकरित्या वाढण्यास मदत झाली. डिस्चार्जच्या वेळी, तो व्यवस्थित स्तनपान करत होता, त्याचे वजन वाढत होते आणि मेंदू, डोळे व श्रवणशक्तीसाठी केलेल्या सर्व तपासण्या सामान्य होत्या. बाळाला ३७ व्या आठवड्यात, २.२ किलो वजनासह घरी सोडण्यात आले आणि तो योग्यरित्या स्तनपान करत होता. बाळाला एकूण १०० दिवस एनआयसीयूमध्ये राहावे लागले. त्याच्या वाढीवर आणि विकासावर लक्ष ठेवण्यासाठी आम्ही नियमित फॅालोअपचा सल्ला दिला आहे,असेही डॉ. रामटेककर यांनी अधोरेखित केले.
जगात अकाली प्रसूतीचा सर्वाधिक प्रमाण असलेल्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे, जिथे सुमारे १३% बाळे मुदतपूर्व जन्माला येतात आणि २०२० मध्ये ३० लाखांहून अधिक प्रीमॅच्युअर बाळ जन्माला येतात. ही नवजात बाळे अत्यंत असुरक्षित असतात आणि त्यांना विशेष काळजीची आवश्यकता भासते अशी प्रतिक्रिया पुण्यातील लुल्लानगर येथील मदरहुड हॉस्पिटल्सचे वरिष्ठ नवजात शिशु तज्ज्ञ डॉ. तुषार पारीख यांनी व्यक्त केली.






