फोटो सौजन्य - Social Media
बँकेत नोकरी करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) या प्रतिष्ठित सरकारी बँकेत तब्बल २७०० अप्रेंटिस (Apprentice) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ११ नोव्हेंबर २०२५ पासून सुरू झाली असून, इच्छुक उमेदवारांनी १ डिसेंबर २०२५ पूर्वी अर्ज पूर्ण करणे आवश्यक आहे.
या भरतीसाठी उमेदवारांनी bankofbaroda.bank.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल. उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी (Graduate) प्राप्त केलेला असावा. वयोमर्यादा २० ते २८ वर्षे इतकी ठेवण्यात आली आहे. तसेच, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय आणि आर्थिक दुर्बल घटकांना शासन नियमांनुसार वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना १२ महिन्यांचे प्रशिक्षण (Training Period) दिले जाणार असून, या कालावधीत दर महिन्याला ₹१५,००० इतका पगार मिळणार आहे. उमेदवारांची निवड प्रक्रिया ऑनलाइन परीक्षा, कागदपत्र पडताळणी, आणि स्थानिक भाषेची चाचणी (Local Language Test) अशा टप्प्यांमधून होईल. विशेष म्हणजे, ही भरती देशभरातील विविध शाखांसाठी करण्यात येत आहे, त्यामुळे उमेदवारांना त्यांच्या राज्यात किंवा शहरात नोकरीची संधी मिळू शकते.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी www.apprenticeshipindia.gov.in किंवा nats.education.gov.in या पैकी कोणत्याही वेबसाइटवर पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे. ही नोंदणी झाल्यानंतरच उमेदवार बँक ऑफ बडोदा भरतीसाठी अर्ज करू शकतात.
ही भरती फ्रेशर्ससाठी उत्तम संधी मानली जात आहे. बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी हा अनुभव भविष्यातील स्थिर नोकरीसाठी मोठं पाऊल ठरू शकतो. प्रशिक्षणादरम्यान उमेदवारांना बँकिंग क्षेत्रातील व्यवहारिक ज्ञान, ग्राहक सेवा, वित्तीय व्यवहार, आणि कार्यालयीन कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे. त्यामुळे पदवीधर तरुणांसाठी ही नोकरी केवळ उत्पन्नाचं साधन नसून, करिअरला योग्य दिशा देणारी संधी ठरू शकते.






