फोटो सौजन्य - Social Media
भारतीय हवाई दलाकडून अग्निवीरवायु योजनेंतर्गत म्युझिशियन पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 21 एप्रिल 2025 पासून सुरू होत असून 11 मे 2025 पर्यंत अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच [agnipathvayu.cdac.in](https://agnipathvayu.cdac.in) येथे अर्ज करता येणार आहे. ही भरती खास संगीत कौशल्य असलेल्या उमेदवारांसाठी असून त्यांना अग्निवीरवायु योजनेच्या अंतर्गत चार वर्षांसाठी सेवा देण्याची संधी मिळणार आहे.
या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांची निवड ही विविध टप्प्यांमधून केली जाणार आहे. सर्वप्रथम दस्तऐवज पडताळणी केली जाईल, त्यानंतर संगीत कौशल्य चाचणी, लेखी परीक्षा, शारीरिक क्षमता चाचणी आणि शेवटी वैद्यकीय तपासणी होणार आहे. उमेदवारांकडून विशिष्ट संगीत वाद्य वाजवण्याचे कौशल्य अपेक्षित आहे. या भरतीतून भारतीय हवाई दलात संगीत क्षेत्रातील युवांना देशसेवेची अनोखी संधी मिळणार आहे.
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचा जन्म 1 जानेवारी 2005 ते 1 जुलै 2008 या कालावधीत झालेला असणे आवश्यक आहे. म्हणजेच, उमेदवारांचे वय हवाई दलाच्या अधिसूचनेनुसार ठरवले जाईल. अर्ज करण्याआधी उमेदवारांनी आपली शैक्षणिक पात्रता, संगीत विषयातील प्राविण्य, वय आणि इतर सर्व अटी व शर्ती काळजीपूर्वक तपासून घ्याव्यात. कोणत्याही चुकीच्या माहितीसह अर्ज केल्यास तो नाकारला जाण्याची शक्यता असते. त्यामुळे अर्ज भरण्यापूर्वी अधिकृत अधिसूचना वाचणे अत्यंत गरजेचे आहे.
या भरती प्रक्रियेतील विविध टप्प्यांचे अद्यावत अपडेट्स, परीक्षा केंद्रांची माहिती, प्रवेशपत्र आणि परीक्षेची तारीख लवकरच अधिकृत संकेतस्थळावर agnipathvayu.cdac.in यावर प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी वेबसाइटवर नियमितपणे भेट देऊन माहिती तपासत राहणे आवश्यक आहे.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम उमेदवारांनी भरतीची अधिकृत अधिसूचना पीडीएफ स्वरूपात वाचून आपली पात्रता तपासावी. त्यानंतर अधिकृत वेबसाइटवरील “Apply Online” लिंकवर क्लिक करून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करावी. अर्ज करताना शैक्षणिक प्रमाणपत्र, संगीत कौशल्याचे पुरावे, ओळखपत्र, पासपोर्ट साईज फोटो व स्वाक्षरी इत्यादी कागदपत्रे अपलोड करावीत. तसेच, संबंधित अर्ज शुल्क देखील ऑनलाइन पद्धतीने भरावे लागेल. अर्ज सादर केल्यानंतर त्याची प्रिंटआउट प्रत भविष्यातील संदर्भासाठी सुरक्षित ठेवावी. ही भरती प्रक्रिया संगीत क्षेत्रातील इच्छुक व पात्र तरुणांसाठी भारतीय हवाई दलात सेवा करण्याची एक अत्यंत मानाची आणि सुवर्णसंधी ठरणार आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांना देशसेवेच्या माध्यमातून आपली संगीत कला सादर करायची आहे, त्यांनी ही संधी न गमावता ठरलेल्या मुदतीपूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे अत्यावश्यक आहे.