फोटो सौजन्य - Social Media
एक यशस्वी आणि समाधानी करिअर घडवण्यासाठी विद्यार्थ्यांनी लवकरच विचार सुरू करणे आवश्यक आहे. करिअर निवडताना केवळ बाह्य दबावाने किंवा समाजाच्या अपेक्षांमुळे निर्णय घेऊ नये. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या आवडी, क्षमता, मर्यादा आणि भविष्याच्या गरजा यांचा सखोल विचार करून योग्य पर्याय निवडला पाहिजे. आपल्याला नेमकं काय करायला आवडतं, कोणत्या क्षेत्रात आपण नैसर्गिकरित्या चांगले आहोत, याचा शोध घेणे हा करिअर प्लॅनिंगचा पहिला टप्पा आहे. अॅप्टिट्यूड चाचण्या, करिअर गाईडन्स सत्रं, वर्कशॉप्स आणि तज्ज्ञांचा सल्ला यामधून स्वतःला समजून घेता येते.
आज पारंपरिक करिअर पर्यायांसोबतच अनेक नवीन आणि नाविन्यपूर्ण क्षेत्रं उभी राहत आहेत. डिजिटल मार्केटिंग, डिझायनिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), सायबर सिक्युरिटी, आर्किटेक्चर, अॅनिमेशन, गेम डेव्हलपमेंट यांसारख्या क्षेत्रांमध्ये प्रचंड संधी आहेत. त्यामुळे अशा नवीन पर्यायांचाही अभ्यास करणे गरजेचे आहे. केवळ डॉक्टर, इंजिनीअर किंवा सरकारी नोकर्या एवढ्यापुरते करिअर मर्यादित ठेवू नये.
१०वीच्या नंतर जर तुम्हाला स्पर्धा परीक्षांचा विचार असेल तर त्यासाठी लवकर तयारी करणे महत्त्वाचे ठरते. NEET, JEE, UPSC, MPSC, SSC, बँक परीक्षा यांसाठी वेळेवर तयारी केली तर यश मिळवणे सोपे होते. या परीक्षांमध्ये स्पर्धा अधिक असल्यामुळे नियोजनबद्ध अभ्यास, योग्य मार्गदर्शन आणि नियमित सराव आवश्यक आहे. याशिवाय हायर एज्युकेशनसाठी देखील तयारी करावी लागते. त्याचबरोबर, विद्यार्थ्यांनी ऑनलाईन किंवा ऑफलाइन शॉर्ट टर्म कोर्सेसही करावेत, जे त्यांना व्यावसायिक जगात उपयोगी पडतील. जसे की डिजिटल स्किल्स, कम्युनिकेशन, इंग्रजी बोलणे, संगणक वापर, प्रेझेंटेशन कौशल्ये इत्यादी.
उच्च शिक्षणाची नींवही १०वी नंतरच घालायला हवी. आपल्या निवडलेल्या स्ट्रीममधील विषयांची माहिती, पुढील संधी, अभ्यासक्रम यांचा सखोल अभ्यास करणे गरजेचे आहे. शेवटी, करिअर निवड ही जीवनाचा महत्त्वाचा निर्णय आहे. योग्य माहिती, स्व-आकलन, मार्गदर्शन आणि प्रयत्नांच्या जोरावरच विद्यार्थ्यांचे स्वप्नातील करिअर घडते.