फोटो सौजन्य - Social Media
भारताची गुप्तचर संस्था म्हणजे Intelligence Bureau (IB), ही देशाच्या अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी सांभाळणारी आणि अत्यंत संवेदनशील काम करणारी यंत्रणा आहे. दहशतवाद, देशविघातक कारवाया, गुप्त माहिती संकलन, आणि राज्यांतर्गत सुरक्षेच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवणं हे IB चे मुख्य काम असते. ही संस्था गृह मंत्रालयाच्या अधिपत्याखाली कार्यरत आहे आणि तिचं मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे. या संस्थेत भरती होणं हे फारच गुप्त आणि खडतर प्रक्रियेतून घडलं जातं. Intelligence Bureau मध्ये मुख्यतः Assistant Central Intelligence Officer (ACIO) या पदासाठी भरती केली जाते. ही भरती गृह मंत्रालयामार्फत (Ministry of Home Affairs) अधिसूचना जारी करून घेतली जाते. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही शाखेतील पदवीधर असणं आवश्यक आहे. वयोमर्यादा 18 ते 27 वर्षांच्या दरम्यान असते, तसेच राखीव प्रवर्गांसाठी शासन नियमांनुसार सूट दिली जाते. IB मध्ये भरतीसाठी उमेदवाराने भारतीय नागरिक असणं बंधनकारक आहे.
भरती प्रक्रिया तीन टप्प्यांत पार पडते. प्रथम टप्पा म्हणजे ऑनलाईन परीक्षा (Tier 1), ज्यामध्ये सामान्य ज्ञान, लॉजिकल रिझनिंग, गणित, आणि इंग्रजी यांचा समावेश असतो. दुसऱ्या टप्प्यात डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा (Tier 2) घेतली जाते, जिथे निबंध लेखन आणि इंग्रजी समज (comprehension) तपासली जाते. अंतिम टप्पा म्हणजे पर्सनल इंटरव्ह्यू (Tier 3), ज्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व सिक्युरिटी क्लिअरन्ससारख्या प्रक्रिया होतात. यानंतर उमेदवाराची पार्श्वभूमी तपासली जाते, ज्यामध्ये त्याच्या कुटुंबाची, सामाजिक वर्तणुकीची आणि राजकीय संबंधांचीही चौकशी केली जाते.
IB मध्ये काम करणं म्हणजे गुप्तचर जाळ्याचा भाग होणं. हे काम अतिशय जबाबदारीचं, सतर्कतेचं आणि संयमाचं असतं. कामाच्या स्वरूपात अनेकदा वेषांतर करून माहिती मिळवावी लागते आणि गोपनीयता पाळावी लागते. ACIO पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला लेव्हल 7 नुसार ₹44,900 ते ₹1,42,400 इतका पगार मिळतो, त्यासोबत DA, HRA आणि Special Security Allowance यांसारखे भत्ते देखील मिळतात.
Intelligence Bureau मध्ये भरती म्हणजे केवळ सरकारी नोकरी नव्हे, तर देशसेवेचं एक मोठं माध्यम आहे. गुप्तता, शिस्त, ताण सहन करण्याची क्षमता आणि देशभक्ती या गुणांमुळेच उमेदवार या सेवेसाठी पात्र ठरतो. जर तुमच्यात ही कुवत आणि इच्छाशक्ती असेल, तर Intelligence Bureau तुमच्यासाठी एक आदर्श संधी ठरू शकते.