फोटो सौजन्य - Social Media
ऑनलाइन सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) अर्ज भरताना उमेदवारांना येणाऱ्या अडचणींबाबत सीईटी कक्षाने महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. वैयक्तिक किंवा लोकसंख्याशास्त्रीय तपशिलांमधील विसंगतीमुळे कोणताही सीईटी अर्ज नाकारला जाणार नाही किंवा उमेदवार अपात्र ठरणार नाही, असे सीईटी सेलने स्पष्ट केले आहे. त्यामुळे नाव, जन्मतारीख, ओळखपत्रातील तपशील यांमध्ये फरक असल्याने घाबरून जाण्याची आवश्यकता नाही, असेही कक्षाने सांगितले.
सीईटी अर्ज प्रक्रियेदरम्यान नाव, जन्मतारीख, आधार क्रमांक किंवा इतर ओळखपत्रांमधील तपशीलांमध्ये तफावत असल्याच्या तक्रारी अलीकडे मोठ्या प्रमाणावर सीईटी कक्षाकडे प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, अशा कोणत्याही विसंगतीमुळे उमेदवाराची सीईटीसाठीची पात्रता बाधित होत नाही, असे स्पष्ट करत सीईटी कक्षाने विद्यार्थी आणि पालकांना दिलासा दिला आहे.
अपार आयडी (APAAR ID) संदर्भातही सीईटी कक्षाने महत्त्वाची माहिती दिली आहे. अपार आयडी तयार करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी, सुलभ आणि पूर्णपणे ऐच्छिक असल्याचे कक्षाने स्पष्ट केले. उमेदवारांनी इयत्ता १० वी किंवा १२ वीच्या गुणपत्रिकेतील तपशील भरले नाहीत, तरीही अपार आयडी तयार करता येतो. शैक्षणिक माहिती नसल्यामुळे अपार आयडी तयार करण्यास किंवा सीईटी अर्ज सादर करण्यास कोणताही अडथळा येत नाही, असेही सीईटी कक्षाने स्पष्ट केले.
तांत्रिक कारणांमुळे किंवा वैयक्तिक तपशिलांतील विसंगतीमुळे कोणताही सीईटी अर्ज नाकारला जात नाही, असे अधिकाऱ्यांनी ठामपणे सांगितले. नाव, जन्मतारीख किंवा इतर वैयक्तिक तपशील कागदपत्रांनुसार वेगळे असले, तरीही उमेदवारांना अर्ज पुढे भरण्याची व सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे. आवश्यक असल्यास विहित नियमांनुसार पुढील टप्प्यावर दुरुस्ती करता येऊ शकते.
सीईटी कक्षाने नमूद केले की, ऑनलाइन सीईटी अर्ज प्रणाली पुरेशी लवचिक ठेवण्यात आली आहे. उमेदवार आधार कार्ड, एचएससी प्रमाणपत्र किंवा अन्य अधिकृत कागदपत्रांनुसार स्वतःचे वैयक्तिक तपशील भरू शकतात. नोंदींमध्ये तफावत लक्षात घेऊन अर्जामध्ये उमेदवाराचे नाव भरण्यासाठी तीन स्वतंत्र रकाने देण्यात आले आहेत. आधार कार्डनुसार नाव, एचएससी प्रमाणपत्रानुसार नाव किंवा इतर स्वीकार्य कागदपत्रांनुसार नाव भरता येते.
नोंदींमध्ये किरकोळ विसंगती असली, तरीही प्रणाली उमेदवारांना अर्ज भरण्यापासून, सादर करण्यापासून किंवा पूर्ण करण्यापासून अडवत नाही. अशा विसंगतींचे निराकरण नंतरच्या टप्प्यावर अधिकृत कार्यपद्धतीनुसार करता येते, असेही सीईटी कक्षाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, उमेदवारांनी गैरसमजांना बळी न पडता, वैध कागदपत्रांच्या आधारे शांतपणे आणि काळजीपूर्वक सीईटी अर्ज भरावेत, असे आवाहन सीईटी कक्षाकडून करण्यात आले आहे.






