कचेरी चौकातील राजूची चहाची टपरी गेल्या अनेक वर्षांपासून सर्वसामान्यांसह राजकीय मंडळींसाठीही ‘चाय पे चर्चा’चे हक्काचे ठिकाण राहिली आहे. मात्र आयुष्याने राजू बजबळकर यांच्यावर कठोर परीक्षा घेतली. लहानपणी त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाले.
अल्पशिक्षण, आर्थिक अडचणी आणि जबाबदाऱ्यांचे ओझे असूनही त्यांनी हार मानली नाही. पडेल ते काम करत अखेर वृत्तपत्र टाकण्याचा व्यवसाय स्वीकारला. या प्रवासात पत्नीनेही त्यांना खंबीर साथ दिली. आई-वडिलांचे कष्ट सतत डोळ्यासमोर ठेवत एकुलत्या एक असणाऱ्या संग्रामने १२ वी नंतर लष्करात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगले.
तीन वर्षे सातत्याने प्रयत्न केले. मात्र तीन वेळा अपयश आले. तरीही अपयशाने खचून न जाता त्याने अभ्यास सुरूच ठेवला. सांगोला येथील एका अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला, पण आर्थिक परिस्थितीमुळे ती सोडावी लागली. त्यानंतर युट्यूबवरील ऑनलाईन वर्गाच्या माध्यमातून घरीच, व घराशेजारील दत्त टेकडी परिसरात फिजिकलचा सराव व अभ्यास सुरू ठेवला.
फेब्रुवारी २५ मध्ये त्याने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची लेखी परीक्षा दिली. त्यानंतर शारीरिक व वैद्यकीय चाचणीसह सर्व आवश्यक टप्पे यशस्वीरित्या पूर्ण केले. अखेर त्याची निवड जाहीर झाली. औद्योगिक सुरक्षा प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो सेवेत रुजू होणार आहे. याच क्षेत्रात वरिष्ठ पदापर्यंत पोहोचण्याचा निर्धार संग्रामने व्यक्त केला आहे.
“आई-वडिलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवूनच अभ्यास केला. शासकीय नोकरीत लागून त्यांच्या कष्टाला पूर्ण न्याय द्यायचा हाच हेतू होता, असे सांगताना संग्राम भावूक झाला. गेली तीन दशके राजेंद्र बजबळकर हे रोज पहाटे पाच वाजता वृत्तपत्र टाकतात. दिवसभर उभे राहून लोकांना चहा देत सेवा करतात.
निकाल जाहीर झाल्यानंतर आज संग्राम आणि त्याचे मित्र चहाच्या टपरीवर आले, राजेंद्र यांना मिठी मारली आणि अभिनंदन केले, त्या क्षणी राजूच्या डोळ्यांतून आनंदाश्रू ओघळले, “कष्टाची चीज झाली, पोरगं मोठं झालं,” असे शब्द त्यांच्या तोंडातून बाहेर पडताच उपस्थितांच्याही डोळ्यांच्या कडा पाणावल्या.
आजदिवसभर अनेक जण राजू बजबळकरांना गुलाल का लावला असे विचारत होते तेव्हा त्यांना मुलगा नेमका कोणत्या पदावर गेला? हे ही माहीत नव्हते. त्यावर साध्या शब्दांत ते सांगत होते. “साहेब झाला सरकारी नोकरीत गेला परीक्षा पास झाला.” पदाची नेमकी माहिती नसली तरी मुलाच्या यशाचा अभिमान त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट झळकत होता. भारत सरकारच्या गृह मंत्रालयाअंतर्गत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात संग्राम देशातील महत्त्वाच्या उद्योग, विमानतळे, मेट्रो, अणुऊर्जा प्रकल्प, बंदरे, राष्ट्रपती भवन, सर्व मंत्रालये, सरकारी कार्यालये याची सुरक्षा करण्याचे काम करेल.






