सांगलीत जिल्हा परिषद शाळांचा डंका!
जिल्हा परिषद प्रशासनाने ‘माझी शाळा आदर्श शाळा’ या उपक्रमांतर्गत यंदाचा प्रवेशोत्सव अधिक आकर्षक व विद्यार्थीकेंद्री केला. जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये चिमुकल्यांचे औक्षण, पाटीपूजन, पुस्तकांची गुढी, सरस्वती पूजन, तसेच फुले-फुगे देऊन स्वागत करण्यात आले. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांच्या ‘पहिल्या पावलांचे ठसे’ घेऊन संस्मरणीय क्षण नोंदवण्यात आले.
“जिल्हा परिषद शाळा या केवळ शिक्षण देणाऱ्या संस्था नसून मुलांच्या उज्ज्वल भवितव्याचा मजबूत पाया आहेत. तज्ज्ञ शिक्षक, डिजिटल साधने, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि सर्वांगीण विकास यावर आमचा भर आहे. पालकांनी जिल्हा परिषद शाळांवर विश्वास ठेवून आपल्या पाल्यांचा प्रवेश येथे निश्चित करावा,”
– मुख्य कार्यकारी अधिकारी, विशाल नरवाडे “नवीन विद्यार्थ्यांचे नियमित अध्यापन उद्यापासून सुरू होणार आहे. १ मेपर्यंत सातत्याने मार्गदर्शन केले जाणार असून अंगणवाडी सेविका व शिक्षक यांचा समन्वय साधून हा उपक्रम राबवला जात आहे. पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढेल, असा विश्वास आहे. पुढील आठवडाभर प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार आहे,”
– मोहन गायकवाड, शिक्षणाधिकारी
विटा, तासगाव, कडेगाव आणि शिराळा या तालुक्यांनी प्रवेशोत्सवात आघाडी घेतली असून या भागात पालकांचा जिल्हा परिषद शाळांकडे अधिक विश्वास दिसून आला.आटपाडी, जत आणि मिरज या तालुक्यांमध्ये सरासरी प्रतिसाद मिळाला असून या ठिकाणी प्रवेश वाढीसाठी अजून प्रयत्नांची गरज आहे.पलूस, कवठेमहांकाळ आणि वाळवा या तालुक्यांमध्ये तुलनेने कमी प्रतिसाद नोंदला गेला. विशेषतः वाळवा तालुका सर्वात कमी प्रतिसाद असलेला ठरला.






