फोटो सौजन्य - Social Media
दिल्ली विद्यापीठाच्या (DU) महाविद्यालयांमध्ये नॉन-टीचिंग पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. जर तुम्हाला दिल्ली विद्यापीठाच्या प्रमुख महाविद्यालयांमध्ये सरकारी नोकरी मिळवायची असेल, तर ही एक उत्तम संधी आहे. या भरती अंतर्गत लायब्रेरियन, ज्युनियर असिस्टंट, ड्रायव्हर, मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) आणि इतर पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी ठरलेल्या अंतिम तारखेच्या आत अर्ज करावा. ही भरती जीसस अँड मेरी कॉलेज, दीन दयाल उपाध्याय कॉलेज, श्याम लाल कॉलेज आणि अदिती महाविद्यालय यांच्यातर्फे जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारांनी संबंधित महाविद्यालयाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन आवश्यक पात्रता आणि अर्ज प्रक्रियेबाबत संपूर्ण माहिती घ्यावी. अर्ज करण्याची अंतिम तारीख प्रत्येक महाविद्यालयासाठी वेगळी आहे. जीसस अँड मेरी कॉलेजसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ८ मार्च २०२५ आहे, दीन दयाल उपाध्याय कॉलेजसाठी १२ मार्च २०२५, श्याम लाल कॉलेजसाठी १४ मार्च २०२५ आणि अदिती महाविद्यालयासाठी १७ मार्च २०२५ निश्चित करण्यात आली आहे.
या भरती प्रक्रियेत उमेदवारांची निवड लिखित परीक्षा, स्किल टेस्ट (कौशल्य चाचणी), मुलाखत आणि शैक्षणिक पात्रता याच्या आधारे केली जाईल. प्रथम उमेदवारांना लेखी परीक्षेला सामोरे जावे लागेल, त्यानंतर पदानुसार आवश्यक कौशल्य चाचणी घेतली जाईल. त्यानंतर यशस्वी उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवले जाईल आणि शेवटी शैक्षणिक पात्रता आणि इतर निकषांनुसार अंतिम निवड केली जाईल.
अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. अर्ज करण्यासाठी DU च्या अधिकृत वेबसाइट dunt.uod.ac.in वर जावे आणि तिथे संबंधित महाविद्यालयाच्या भरतीसाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करावे. अर्ज भरण्याआधी सर्व आवश्यक माहिती काळजीपूर्वक वाचा आणि योग्य तपशील भरा. सर्वप्रथम रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करा, त्यानंतर लॉगिन करून अर्ज भरा. अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे, फोटो आणि स्वाक्षरी योग्य फॉरमॅटमध्ये अपलोड करावी. अर्ज फी ऑनलाइन भरल्यानंतर अंतिम सबमिशन करावे आणि त्याची प्रिंटआउट काढून ठेवावी.
अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी भरती प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यासाठी सज्ज असावे. अधिक माहितीसाठी आणि अपडेट्ससाठी दिल्ली विद्यापीठाच्या किंवा संबंधित महाविद्यालयाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. सरकारी नोकरीसाठी ही संधी लाभदायक ठरू शकते, त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.