जेव्हा एखादा प्रवासी तिकीट बुक करतो, तेव्हा पेमेंट गेटवे किंवा बँकेच्या सर्व्हरमधील त्रुटीमुळे अनेकदा ट्रान्झॅक्शन ‘फेल’ होते. अशा परिस्थितीत प्रवाशाच्या खात्यातून पैसे तर कापले जायचे, पण तिकीट कन्फर्म होत नसे. प्रवाशाचा वेळ तर वाया जायचाच, पण कापलेली रक्कम परत मिळवण्यासाठी किमान ३ ते ७ कामकाजाचे दिवस वाट पाहावी लागायची. ऐनवेळी तिकीट काढणाऱ्या प्रवाशांसाठी ही मोठी आर्थिक अडचण असायची.
IRCTC ने दिलेल्या माहितीनुसार, आता तिकीट बुकिंग फेल झाले तरी प्रवाशांना घाबरण्याचे कारण नाही. जर पैसे कापले गेले आणि तिकीट बुक झाले नाही, तर प्रवासी त्याच दिवशी त्या कापलेल्या रकमेचा वापर करून पुन्हा तिकीट बुक करू शकतील. रिफंडची वाट पाहण्याची गरज नाही नवीन सुविधेमुळे प्रवाशाला पुन्हा नव्याने पैसे भरण्याची गरज पडणार नाही. आधीच कापलेली रक्कम ‘रिझ्युम’ करून तिकीट प्रक्रिया पूर्ण करता येईल. ही सुविधा तेव्हाच उपलब्ध होईल जेव्हा दुसऱ्यांदा तिकीट बुक करतानाची रक्कम ही पहिल्या अयशस्वी ट्रान्झॅक्शनच्या रकमेइतकीच असेल.
Indian Railway :- रुळावर येतेय भारतीय रेल्वे : महसुलात ५.१ टक्क्यांची वाढ, आर्थिक स्थिती मजबूत
ही सुविधा IRCTC च्या अधिकृत iPay पेमेंट गेटवेचा वापर करणाऱ्या प्रवाशांसाठी उपलब्ध आहे. १० फेब्रुवारी २०२६ पासून ही यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. प्रवासी कार्ड, UPI, नेट बँकिंग किंवा डिजिटल वॉलेट यांपैकी कोणत्याही माध्यमाचा वापर करून या फिचरचा लाभ घेऊ शकतात. समजा, दुसऱ्या प्रयत्नातही तिकीट बुक होऊ शकले नाही, तरच प्रवाशाची रक्कम नियमानुसार त्यांच्या मूळ खात्यात रिफंड केली जाईल.
IRCTC च्या या निर्णयामुळे रेल्वेची डिजिटल तिकीट प्रणाली अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर झाली आहे. दररोज लाखो लोक तिकीट बुकिंग फेल होण्याच्या समस्येमुळे त्रस्त असायचे. आता या नवीन तंत्रज्ञानामुळे प्रवाशांचा पैसा आणि वेळ दोन्ही वाचणार असून, रेल्वे प्रवासाचा अनुभव अधिक सुखकर होणार आहे.






