फोटो सौजन्य - Social Media
UPSC ही भारतातील सर्वात कठीण स्पर्धा परीक्षा मानली जाते. दरवर्षी लाखो उमेदवार यामध्ये नशीब आजमावत असतात, मात्र काहीच जण यश मिळवू शकतात. अशाच काही निवडक जिद्दी लोकांपैकी एक आहेत उत्तर प्रदेशमधील आजमगढ जिल्ह्यातील लहानशा गावातले बजरंग प्रसाद यादव.
बजरंग यादव यांचे बालपण हलाखीत गेले. शिक्षण सुरू असतानाच त्यांच्या आयुष्यात 2014 साली मोठा आघात झाला, जेव्हा ते दहावीमध्ये शिकत असताना त्यांच्या वडिलांची काही अज्ञात व्यक्तींनी निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे त्यांचं कुटुंब आर्थिकदृष्ट्या खचून गेलं. मात्र त्यांनी शिक्षण थांबवले नाही. वडिलांची छत्रछाया हरवलेली असताना घर चालवणे, अभ्यास करणे आणि मानसिक तणाव झेलणे. या सगळ्या जबाबदाऱ्या बजरंग यांच्यावर आल्या. काही वेळा ट्युशनसाठी पैसे नसल्यानं घरातील धान्य विकावं लागलं.
पण या कठीण काळातही बजरंग प्रसाद यादव यांनी वडिलांचे स्वप्न जपून ठेवले—ते म्हणजे मुलगा मोठा अधिकारी व्हावा. वडिलांच्या निधनानंतर आयुष्य अंधारात गेलं होतं, पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर UPSC परीक्षेची तयारी सुरू केली. सुरुवातीचे दोन प्रयत्न अयशस्वी झाले, पण त्यांनी त्यातून शिकून अधिक जोमाने तयारी चालू ठेवली. त्यांची मेहनत आणि चिकाटी अखेर फळाला आली आणि 2022 साली त्यांच्या तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी UPSC परीक्षेत 454 वा ऑल इंडिया रँक मिळवला. या यशामुळे त्यांची IPS अधिकारी पदासाठी निवड झाली. त्यांचं म्हणणं आहे की, “ही नोकरी फक्त माझी नाही, तर माझ्या वडिलांच्या स्वप्नांची पूर्णता आहे.” ही यशोगाथा केवळ त्यांच्या वैयक्तिक यशापुरती मर्यादित नाही, तर लाखो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान ठरते.
त्यांनी जीवनातील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत आपल्या स्वप्नांना आकार दिला. त्यांना आता असा अधिकारी बनायचं आहे, जो गरीब, पीडित आणि अन्यायग्रस्त लोकांसाठी लढेल, त्यांना न्याय मिळवून देईल. त्यांचा संघर्ष हे दाखवतो की परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, अडचणी कितीही मोठ्या असल्या, तरी जर एखाद्याजवळ स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वास असेल, तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. IPS बजरंग यादव यांची कहाणी हे एक जिवंत उदाहरण आहे की खऱ्या इच्छाशक्तीसमोर कोणतीही अडथळा थांबत नाही.