फोटो सौजन्य - Social Media
सिव्हिल सेवा म्हणजेच IAS, IPS किंवा IFS ही पदं अनेक तरुणांसाठी स्वप्नासारखी असतात. या परीक्षा पास होण्यासाठी अनेकजण चांगल्या पगाराच्या नोकऱ्याही सोडतात. अशीच एक प्रेरणादायी कहाणी आहे उत्तराखंडच्या तृप्ती भट्ट यांची, ज्या एक यशस्वी IPS अधिकारी आहेत. त्यांनी UPSC परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण करताना तब्बल १६ शासकीय नोकऱ्यांचे ऑफर ठुकरावले होते.
तृप्ती भट्ट यांचा जन्म आणि शिक्षण उत्तराखंडच्या अल्मोरा जिल्ह्यात झाले. त्यांचे कुटुंब शिक्षकांशी संबंधित होते. चार भावंडांमध्ये त्या सर्वात मोठ्या असल्यामुळे जबाबदारीचे भान त्यांना लहानपणापासूनच होते. त्यांचे शालेय शिक्षण बीरशेबा सीनियर सेकेंडरी स्कूल आणि केंद्रीय विद्यालयात झाले. त्यानंतर त्यांनी पंतनगर विद्यापीठातून इंजिनिअरिंगची पदवी घेतली. पदवी घेतल्यानंतर त्यांनी NTPC या नामांकित कंपनीत असिस्टंट मॅनेजर म्हणून करिअरची सुरुवात केली.
परंतु मन कुठे तरी देशसेवेत रमत होते. ISROसह अनेक शासकीय संस्थांमधून आलेल्या नोकरीच्या संधी त्यांनी धाडसाने नाकारल्या. यामागे त्यांचे UPSC परीक्षा पास होण्याचे स्वप्न होते. त्यांचं जीवन बदलून टाकणारा क्षण आला तो नववीत असताना, जेव्हा त्यांना भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची भेट घेण्याची संधी मिळाली. त्यांनी कलाम सरांना स्वतःच्या हाताने लिहिलेलं पत्र दिलं होतं, ज्यामध्ये त्यांनी देशसेवेसाठीची आपली तीव्र इच्छाही व्यक्त केली होती.
तृप्तीने 2013 मध्ये UPSC चा पहिलाच प्रयत्न केला आणि त्यात त्यांनी देशात 165वा क्रमांक मिळवला. त्यांनी IPS सेवा निवडली आणि आपल्या होम कॅडरमध्ये त्यांची नियुक्ती झाली. त्यांनी देहरादूनमध्ये पोलीस अधीक्षक म्हणून कामाची सुरुवात केली. यानंतर त्यांनी चमोली जिल्ह्यात एसपी म्हणून जबाबदारी सांभाळली, तसेच SDRF च्या टिहरी गढवाल युनिटमध्ये कमांडर म्हणून काम केलं. सध्या त्या देहरादूनमध्ये गुप्तचर विभागात एसपी म्हणून कार्यरत आहेत. तृप्ती भट्ट केवळ उत्कृष्ट अधिकारी नाहीत, तर त्या एक उत्तम खेळाडूही आहेत. त्यांनी अनेक मॅरेथॉन स्पर्धांमध्ये भाग घेतला असून स्टेट लेव्हल बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहेत. तायक्वांदो आणि कराटेमध्येही त्या पारंगत आहेत. देशसेवेसाठीचे त्यांचे समर्पण आणि चिकाटी सर्व तरुणांसाठी एक आदर्श आहेत.