फोटो सौैजन्य - Social Media
एक काळ होता, जेव्हा लग्नानंतर महिलांना आपले करिअर सोडून घराची जबाबदारी स्वीकारावी लागायची. पण आजच्या काळात अनेक महिलांनी हे समीकरण मोडीत काढलं आहे. अशाच प्रेरणादायी महिला म्हणजे IPS अधिकारी तनुश्री, ज्या काश्मीरसारख्या संवेदनशील भागात जबाबदारीने सेवा बजावत आहेत. त्यांनी हे सिद्ध केलं आहे की, लग्नानंतरही यशस्वी कारकीर्द घडवता येते. तनुश्री यांचा जन्म २४ एप्रिल १९८७ रोजी बिहार राज्यातील मोतिहारी येथे झाला. त्यांचं शालेय शिक्षण मोतिहारीत झालं, तर १२वी त्यांनी बोकारोच्या DAV पब्लिक स्कूलमधून पूर्ण केली. त्यानंतर त्या दिल्लीला गेल्या आणि दिल्ली विद्यापीठाच्या मिरांडा हाऊस कॉलेजमधून त्यांनी इतिहासात ऑनर्स केलं. याच कालावधीत त्यांनी UPSC परीक्षेची तयारी सुरू केली.
परीक्षेच्या तयारीदरम्यानच २०१५ मध्ये त्यांचा विवाह झाला. त्यानंतरही त्यांनी घर आणि अभ्यास यांचं उत्तम संतुलन राखत २०१६ मध्ये पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण केली. त्याआधी २०१४ मध्ये त्यांनी CRPF मध्ये असिस्टंट कमांडंट म्हणून काम सुरू केलं होतं. UPSCमध्ये यश मिळाल्यानंतर २०१७ मध्ये त्यांची IPS पदावर निवड झाली आणि AGMUT कॅडर मिळाला.
तनुश्री यांनी जम्मू-काश्मीरमधील शोपियां जिल्ह्यात वरिष्ठ पोलीस अधीक्षक (SSP) म्हणून जबाबदारी सांभाळली. त्याशिवाय त्या स्टेट इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (SIA) मध्ये SP पदावर कार्यरत होत्या. अशा भागात कार्य करताना सुरक्षा, दहशतवाद आणि कायदा-सुव्यवस्था यासारख्या अनेक आव्हानांना सामोरं जावं लागतं. तरीही त्यांनी यशस्वीपणे हे कर्तव्य पार पाडलं. त्यांच्या यशामागे कुटुंबाचं मोठं योगदान आहे. त्यांचे वडील DIG पदावर कार्यरत होते आणि त्यांची बहीण CRPF मध्ये कमांडंट आहे. तनुश्री आपल्या यशाचं श्रेय आपल्या पालकांना देतात.
सध्या तनुश्री केवळ एक अधिकारी नाहीत तर आईचं सुखही अनुभवत आहेत. त्यांनी आपल्या मुलासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत मातृत्वाचा सुंदर क्षण साजरा केला आहे. तनुश्री यांची कहाणी हे उदाहरण आहे की जिद्द, संयम आणि चिकाटी असेल तर कुठल्याही अडचणीवर मात करून यश प्राप्त करता येतं.