फोटो सौजन्य - Social Media
पश्चिम बंगाल पोलिस दलातील वरिष्ठ IPS अधिकारी मुरलीधर शर्मा हे आज केवळ एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणूनच नव्हे, तर एक क्रिएटिव्ह व्यक्तिमत्त्व म्हणूनही चर्चेत आहेत. पोलिस दलात आपल्या कडक शिस्तप्रिय स्वभाव, तीक्ष्ण बुद्धी आणि प्रामाणिक कामामुळे त्यांनी विशेष ओळख निर्माण केली आहे. गुन्हेगारी जगतातील अनेक मोठी प्रकरणे त्यांनी यशस्वीरीत्या तपासून उकल केली असून, सामान्य नागरिकांचा पोलिस दलावर विश्वास टिकवून ठेवण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा दुसरा पैलू म्हणजे त्यांचा साहित्यिक आणि कलात्मक आवडीनिवडींकडे असलेला कल. कविता, शायरी आणि गझल यांची आवड जोपासणारे शर्मा यांनी आता थेट चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे.
शर्मा यांनी बंगाली चित्रपट ‘मृगया’ साठी हिंदी आयटम साँग ‘शोर मचा’ लिहिले असून, हे गाणे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. सुप्रसिद्ध गायिका सुनिधी चौहान आणि गायक राणा मजूमदार यांनी आपल्या सुरेल आवाजात या गाण्याला जिवंत केले आहे. या गाण्याला आकर्षक कोरिओग्राफीदेखील लाभली आहे, त्यामुळे चित्रपटात याचे महत्त्व अधिक वाढले आहे. जेव्हा चित्रपट निर्मात्यांना एक दमदार हिंदी आयटम नंबरची गरज भासली, तेव्हा मुरलीधर शर्मा यांनी स्वतः गीत लेखन करण्याची तयारी दर्शवली.
त्यांच्या शब्दांना चित्रपटाच्या दिग्दर्शकासह संगीत टीमने एवढे मनापासून पसंत केले की कोणतेही बदल न करता गीताला थेट मंजुरी मिळाली. जून 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या या थ्रिलर चित्रपटात गुन्हे, पोलिस तपास आणि थरारक घटनांचा सुरेख संगम आहे. त्यात ‘शोर मचा’ या गाण्याने वेगळाच रंग भरला आहे.
हरियाणातील साध्या घरातून येणार्या मुरलीधर शर्मा यांनी UPSC सारखी कठीण परीक्षा उत्तीर्ण करून IPS पद मिळवले. भाषांवर त्यांची पकड विलक्षण असून हिंदी, इंग्रजी, उर्दू आणि बांग्ला या चारही भाषांमध्ये ते सहजतेने लेखन करू शकतात. शिक्षणाच्या काळात ते गझल व शायरी लिहायचे. या छंदातूनच पुढे त्यांनी चित्रपटसृष्टीत गीतकार म्हणून आपली छाप पाडली. एका बाजूला पोलिसांची जबाबदारी, गुन्ह्यांशी झुंज आणि शिस्तप्रियतेची प्रतिमा तर दुसऱ्या बाजूला साहित्यिक सर्जनशीलतेचा सुंदर आविष्कार! मुरलीधर शर्मा यांचे व्यक्तिमत्त्व हे दुहेरी पैलूंनी समृद्ध आहे. म्हणूनच ते फक्त शिस्तप्रिय आणि धडाडीचे अधिकारी नसून संवेदनशील व क्रिएटिव्ह लेखक म्हणूनही आज जनतेच्या चर्चेत आहेत.