फोटो सौजन्य - Social Media
भारत सरकार अंतर्गत कार्यरत असलेली नवरत्न कंपनी NHPC Limited ही देशातील सर्वात मोठी जलविद्युत प्रकल्प संस्था मानली जाते. जलविद्युताबरोबरच कंपनी सौर, वारा आणि ग्रीन हायड्रोजन या प्रकल्पांवरही काम करत असून ऊर्जा क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. अशा या प्रतिष्ठित सार्वजनिक उपक्रमात नोकरीची संधी मिळवण्यासाठी NHPC Non-Executive Recruitment 2025 अंतर्गत २४८ पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. हिमालयीन प्रदेशातील निसर्गरम्य वातावरणात काम करण्याची ही सुवर्णसंधी ठरणार आहे.
या भरतीसाठी कंपनीने जाहिरात क्र. NH/Rectt./04/2025 प्रसिद्ध केली आहे. एकूण २४८ पदांमध्ये असिस्टंट राजभाषा अधिकारी, ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन), सिनियर अकाउंटंट, सुपरवायझर (IT) आणि हिंदी ट्रान्सलेटर यांचा समावेश आहे. यामध्ये ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हिल) या पदासाठी सर्वाधिक १०९ जागा राखीव असून, मेकॅनिकल ४९, इलेक्ट्रिकल ४६, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन १७ जागा आहेत. याशिवाय असिस्टंट राजभाषा अधिकारी ११, सिनियर अकाउंटंट १०, सुपरवायझर (IT) १ आणि हिंदी ट्रान्सलेटर ५ जागा आहेत.
या पदांसाठी आवश्यक पात्रतेनुसार उमेदवारांकडे संबंधित शाखेतील डिप्लोमा, पदव्युत्तर किंवा इंटर CA / CMA पास अशी शैक्षणिक अट आहे. उमेदवारांकडे किमान १८ वर्षे वय असावे तर कमाल ३० वर्षे वय (१ ऑक्टोबर २०२५ रोजी) पर्यंत स्वीकारले जाईल. आरक्षित प्रवर्गासाठी वयोमर्यादेत शिथिलता दिली जाणार आहे. भरती प्रक्रियेमध्ये तीन टप्पे असतील. लेखी परीक्षा, कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी. निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती NHPC च्या प्रकल्पांमध्ये केली जाणार आहे.
अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपात केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी NHPC च्या अधिकृत संकेतस्थळावर nhpcindia.com या करिअर सेक्शनमध्ये जाऊन अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्जाची सुविधा २ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०:०० वाजता सुरू होईल आणि १ ऑक्टोबर २०२५ रोजी संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहेत. अर्ज शुल्क General/OBC/EWS प्रवर्गासाठी ७०८ रुपये निश्चित केले आहे. तर SC, ST, PwBD आणि माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. अर्ज करताना उमेदवारांनी आपले सर्व आवश्यक कागदपत्रे आणि पासपोर्ट साईज फोटो स्कॅन करून ठेवणे आवश्यक आहे. ही भरती ऊर्जा क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुण-तरुणींसाठी मोठी संधी ठरणार आहे.