फोटो सौजन्य - Social Media
राज्यातील शाळांच्या विकासासाठी आणि गुणवत्तावृद्धीसाठी ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियानाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. दिवाळीनंतर सुरू झालेल्या द्वितीय सत्रासोबतच या अभियानाची राज्यभरात अंमलबजावणी करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत राज्यातील शाळांना एकूण ₹७२ कोटी २२ लाख रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत. हे अभियान ३ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत राबविण्यात येईल, तर मूल्यांकन प्रक्रिया १ जानेवारी ते ७ फेब्रुवारी २०२६ दरम्यान पार पडेल.
या अभियानात शाळांचे मूल्यांकन तीन मुख्य निकषांवर केले जाणार आहे. पायाभूत सुविधा (३८ गुण), शासनाच्या धोरणांची अंमलबजावणी (१०१ गुण) आणि शैक्षणिक संपादन (६१ गुण). या तीनही घटकांवर एकूण २०० गुणांच्या आधारावर शाळांना गुणांकन दिले जाईल. यासाठी जिल्हा, तालुका आणि महापालिका स्तरावर स्वतंत्र समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. तालुकास्तरावर गटविकास अधिकारी, जिल्हास्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महापालिका क्षेत्रात विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या अध्यक्षतेखाली मूल्यांकनाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.
या उपक्रमात आकर्षक पारितोषिकांची तरतूद करण्यात आली आहे. जिल्हास्तरावर प्रथम ₹११ लाख, द्वितीय ₹५ लाख, आणि तृतीय ₹३ लाख अशी बक्षिसे असतील. तालुकास्तरावर अनुक्रमे ₹३ लाख, ₹२ लाख आणि ₹१ लाख इतकी पारितोषिके दिली जातील. महापालिका स्तरावर प्रथम ₹२१ लाख, द्वितीय ₹१५ लाख आणि तृतीय ₹११ लाख, तर राज्यस्तरीय विजेत्या शाळांना सर्वाधिक म्हणजे प्रथम ₹५१ लाख, द्वितीय ₹३१ लाख आणि तृतीय ₹२१ लाख इतकी बक्षिसे देण्यात येणार आहेत. ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ हा उपक्रम शाळांची भौतिक उभारणी, शिक्षणाची गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांचा एकूण विकास यांना चालना देण्यासाठी राबविण्यात येत आहे. या मोहिमेद्वारे शाळांना केवळ पारितोषिकेच नव्हे, तर शिक्षणात गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रेरणा मिळणार आहे.






