फोटो सौजन्य - Social Media
आजच्या स्पर्धात्मक काळात केवळ डिग्री किंवा मार्क्स असून नोकरी मिळतेच असे नाही. मुलाखतीत (Interview) तुम्ही कसे बोलता, वागता, विचार मांडता आणि स्वतःला कसे सादर करता, यावरच निवड ठरते. अनेक उमेदवार पात्र असूनही केवळ काही छोट्या चुका केल्यामुळे संधी गमावतात. मात्र योग्य तयारी आणि थोडेसे भान ठेवल्यास मुलाखतीत छाप पाडणे नक्कीच शक्य आहे. चला तर जाणून घेऊया, मुलाखतीत यश मिळवण्यासाठीच्या महत्त्वाच्या टिप्स.
मुलाखतीला जाण्याआधी कंपनीबाबत संपूर्ण माहिती घ्या. कंपनी काय काम करते, तिचे व्हिजन, मिशन, अलीकडील प्रोजेक्ट्स किंवा बातम्या यांचा अभ्यास करा. “तुम्हाला आमच्या कंपनीबद्दल काय माहिती आहे?” हा प्रश्न जवळपास प्रत्येक मुलाखतीत विचारला जातो. याचे ठोस उत्तर दिल्यास तुमचा आत्मविश्वास लगेच दिसून येतो. तुमच्या बायोडेटामधील प्रत्येक ओळ तुम्हाला समजलेली असावी. शिक्षण, अनुभव, कौशल्ये किंवा प्रोजेक्ट्स यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. स्वतः लिहिलेल्या गोष्टींबाबत गोंधळ उडाला, तर नकार मिळण्याची शक्यता वाढते.
मुलाखतीत पहिली छाप फार महत्त्वाची असते. स्वच्छ, साधे आणि प्रोफेशनल कपडे घाला. अतिशय भडक किंवा अस्ताव्यस्त पोशाख टाळा. बसण्याची पद्धत, डोळ्यांत डोळे घालून बोलणे, हलके स्मितहास्य आणि आत्मविश्वासपूर्ण देहबोली यामुळे समोरच्यावर सकारात्मक प्रभाव पडतो. उत्तर देताना फार लांब किंवा फारच थोडक्यात बोलू नका. मुद्देसूद, स्पष्ट आणि प्रामाणिक उत्तर द्या. एखाद्या प्रश्नाचे उत्तर माहित नसेल, तर थेट “माहित नाही” म्हणण्यापेक्षा “मी याबाबत शिकण्यास तयार आहे” असे सांगणे अधिक योग्य ठरते. स्वतःच्या कौशल्यांवर विश्वास ठेवा, पण बढाई मारू नका. टीमवर्क, शिकण्याची तयारी आणि जबाबदारी स्वीकारण्याची वृत्ती दाखवा. कंपन्यांना ‘परफेक्ट’ माणसापेक्षा ‘शिकणारा आणि जुळवून घेणारा’ उमेदवार जास्त हवा असतो.
“तुमची ओळख सांगा”, “तुमची ताकद आणि कमकुवतपणा काय?”, “तुम्ही ही नोकरी का हवी आहे?” अशा प्रश्नांची तयारी आधीच करून ठेवा. उत्तर पाठांतरासारखे न वाटता नैसर्गिक असावे. मुलाखतीच्या शेवटी “तुम्हाला काही विचारायचे आहे का?” असे विचारले जाते. तेव्हा पगाराशिवाय काम, टीम, ट्रेनिंग किंवा ग्रोथविषयी प्रश्न विचारा. यामुळे तुमची नोकरीबद्दलची गंभीरता दिसून येते.
योग्य तयारी, सकारात्मक दृष्टिकोन आणि आत्मविश्वास असेल, तर मुलाखतीत छाप पाडणे कठीण नाही. या टिप्स पाळल्यास ‘कॉल आला नाही’ ही तक्रार नक्कीच कमी होईल आणि जॉब मिळण्याची शक्यता वाढेल.






