फोटो सौजन्य- नवराष्ट्र टीम
UGC NET June 2026 Expected Result Date: यावर्षी यूजीसी नेट (UGC NET) जून परीक्षेचे आयोजन २२ ते ३० जून २०२६ या कालावधीत करण्यात आले आहे. एकूण ८७ विषयांसाठी कॉम्प्युटर आधारित ही परीक्षा घेण्यात आली. यावर्षी यूजीसी नेट परीक्षेसाठी १० लाखांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली होती. ही राष्ट्रीय पातळीवरील परीक्षा ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ (NTA) द्वारे आयोजित केली जाते. परीक्षेत एकूण किती उमेदवारांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला, याची अधिकृत माहिती निकालासोबतच जाहीर केली जाईल.
आज ३० जून २०२६ रोजी यूजीसी नेट जून परीक्षेचा शेवटचा दिवस असून परीक्षा दोन शिफ्टमध्ये आयोजित केली जाईल. पहिली शिफ्ट सकाळी ०९:०० ते दुपार १२:०० वाजेपर्यंत असेल, तर दुसरी शिफ्ट दुपारनंतर ०३:०० ते संध्याकाळी ०६:०० वाजेपर्यंत असेल. परीक्षा संपल्यानंतर आता सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष रिस्पॉन्स शीट, प्रोव्हिजनल आन्सर-की, फायनल आन्सर-की आणि निकालाकडे लागले आहे. एनटीएच्या (NTA) जुन्या पद्धतीनुसार परीक्षा संपल्यानंतरची पुढील प्रक्रिया कशी असेल आणि त्याच्या संभाव्य तारखा काय आहेत. हे आता आपण पाहूया..
यूजीसी नेट जून परीक्षा संपल्यानंतर १० ते १५ दिवसांच्या आत NTA आपल्या अधिकृत संकेतस्थळावर प्रोव्हिजनल आन्सर-की आणि उमेदवारांची रिस्पॉन्स शीट जारी करते. त्यानुसार, जुलै २०२६ च्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच १० ते १५ जुलैच्या दरम्यान प्रोव्हिजनल आन्सर-की जाहीर होण्याची शक्यता आहे.
ऑब्जेक्शन विंडो (Objection Window): प्रोव्हिजनल आन्सर-की जारी केल्यानंतर उमेदवारांना हरकती नोंदवण्यासाठी २ ते ३ दिवसांचा वेळ दिला जातो. या कालावधीत उमेदवार प्रति प्रश्न निश्चित शुल्क भरून चुकीच्या उत्तरांवर आक्षेप नोंदवू शकतात.
प्रोव्हिजनल आन्सर-की आणि ऑब्जेक्शन विंडो बंद झाल्यानंतर पुढील प्रक्रिया फायनल आन्सर-की जाहीर करण्याची असते. उमेदवारांकडून आलेल्या हरकतींची तपासणी तज्ज्ञांच्या समितीकडून केली जाते, त्यानंतरच फायनल आन्सर-की प्रसिद्ध केली जाते. जुलै महिन्याच्या अखेरीस ही फायनल आन्सर-की जारी केली जाऊ शकते.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे (NTA) फायनल आन्सर-कीच्या आधारावरच अंतिम निकाल आणि स्कोअरकार्ड जारी केला जातो. यूजीसी नेट जून २०२६ चा अंतिम निकाल एनटीएच्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध होईल. असा अंदाज आहे की, ऑगस्ट २०२६ च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात यूजीसी नेट जून परीक्षेचा निकाल घोषित केला जाऊ शकतो.






