फोटो सौजन्य - Social Media
UPSC म्हणजे भारतातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक. लाखो विद्यार्थ्यांचे स्वप्न असलेली ही परीक्षा केवळ अभ्यासानेच नव्हे, तर चिकाटी, धैर्य आणि समर्पण यामुळेच पार होते. याच परीक्षेत 2024 मध्ये देशात प्रथम क्रमांक पटकावणारे आदित्य श्रीवास्तव हे आज अनेक तरुणांसाठी आदर्श ठरत आहेत. आदित्य यांचे बालपण लखनऊमध्ये गेले. त्यांनी आपले शालेय शिक्षण CMS अलीगंज येथून पूर्ण केले. अभ्यासात नेहमीच प्राविण्य मिळवणाऱ्या आदित्य यांनी IIT कानपूरमधून बीटेक आणि एमटेक पूर्ण केलं. या शैक्षणिक प्रवासात त्यांना त्यांच्या आजोबांची आर्थिक मदत मिळाली. पुढे जर्मनीकडून मिळालेल्या शिष्यवृत्तीचा उपयोग त्यांनी शिक्षणासाठी केला.
IIT पूर्ण केल्यानंतर त्यांनी काही वर्षं खासगी क्षेत्रात काम केलं. मात्र मन कुठेतरी प्रशासन सेवेत अडकलेलं होतं. त्यांच्या आईच्या कुटुंबातील एक सदस्य IAS अधिकारी होते, त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आदित्य यांनी UPSC परीक्षेची तयारी सुरू केली. पहिल्या प्रयत्नातच त्यांना प्रिलिम्स परीक्षेत अपयश आलं. पण त्यांनी खचून न जाता स्वतःवर विश्वास ठेवत पुन्हा नव्यानं अभ्यास सुरू केला. दुसऱ्या प्रयत्नात त्यांना 236वा क्रमांक मिळवून IPS पद मिळालं. पण त्यांचं अंतिम ध्येय IAS होणं होतं. तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी ऑल इंडिया रँक 1 मिळवून हे स्वप्न पूर्ण केलं.
आदित्य यांनी कोणतीही मोठी कोचिंग क्लासेस न लावता पूर्णपणे स्व-अभ्यासावर विश्वास ठेवत आपल्या अभ्यासाची आखणी केली. त्यांनी UPSC परीक्षेसाठी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग हे आपलं पर्यायी विषय (optional subject) म्हणून निवडलं, ज्यामध्ये त्यांना IITमधील शिक्षणाचा उपयोग झाला. दिवसाचे किमान 10 ते 12 तास सातत्याने अभ्यास करत त्यांनी आपला वेळ व्यवस्थित नियोजनबद्ध पद्धतीने वापरला. अभ्यासाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांनी स्वतःची चाचणी घेणं, नोट्स तयार करणं आणि मागील प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करणं यावर भर दिला.
तणावग्रस्त अवस्थांमध्ये त्यांनी स्वतःला सावरण्यासाठी संगीताचा आधार घेतला, ज्यामुळे मन शांत राहायचं. अभ्यासाव्यतिरिक्त ते फक्त जेवणासाठीच आपल्या खोलीबाहेर पडायचे. या कठोर आणि शिस्तबद्ध अभ्यासपद्धतीमुळेच त्यांना यशाच्या शिखरावर पोहोचता आलं. आदित्य श्रीवास्तव यांची ही यशोगाथा UPSCसारख्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला हे शिकवते की, अपयश आल्यावर खचून न जाता पुन्हा उभं राहणं महत्त्वाचं असतं. अपयश म्हणजे पराभव नव्हे, तर नवे ध्येय निश्चित करण्याची आणि नव्या उमेदीनं सुरूवात करण्याची संधी असते. हेच आदित्य यांनी आपल्या उदाहरणातून दाखवून दिलं आहे.