फोटो सौजन्य- सोशल मीडिया
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी यांचे आज दि. 26 सप्टेंबर रोजी उपचारा दरम्यान निधन झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डॉ चौधरी यांना यकृताची समस्या असल्याने नागपूरमधील किंग्सवे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. या उपचारादरम्यानच आज सकाळी त्यांचे निधन झाले. ते 59 वर्षाचे होते. त्यांच्या निधनामुळे शैक्षणिक क्षेत्रामध्ये शोककळा पसरली आहे. केद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी x वर डॉ चौधरी यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पित केली आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुभाष चौधरी यांच्या निधनाचे वृत्त दु:खद आहे. त्यांना माझी विनम्र श्रद्धांजली. शैक्षणिक क्षेत्रात डॉ चौधरी यांचे भरीव योगदान राहिले आहे. मृदुभाषी आणि विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देणारे कुलगुरू म्हणून ते कायम स्मरणात…
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) September 26, 2024
डॉ चौधरी हे यकृताच्या आजारावर काही महिन्यांपासून उपचार घेत होते. हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावली होती. त्यावेळी मुंबईला नेण्याचाही निर्णय घेतला होता मात्र एअर अॅम्बुलन्स न मिळाल्याने त्यांच्यावर नागपूरातील खासगी हॉस्पीटलमध्येच उपचार सुरु ठेवण्यात आले मात्र उपचारादरम्यानच त्यांच निधन झाले.
डॉ . सुभाष चौधरी यांचा परिचय
डॉ . सुभाष चौधरी यांचा जन्म 18 मे 1965 रोजी झाला. त्यांनी सिव्हिल इंजिनियरिंग मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले तसेच त्यांनी पीचडी प्राप्त केली होती. डॉ. चौधरी यांना अध्यापन, संशोधन आणि शैक्षणिक प्रशासन या क्षेत्राचा दांडगा अनुभव होता. 2020 मध्ये त्यांची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगूरपदी निवड झाली होती. नागपूर विद्यापीठाचा शतकोत्तर महोत्सवी सोहळा त्यांच्या कुलगुरुपदाच्या कार्यकाळात झाला. त्यावेळी राष्ट्रपती उपराष्ट्रपतीपासून देशभरातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली. विशेष म्हणजे गेल्या वर्षी त्यांच्या नेतृत्वात इंडियन सायन्स कॉंग्रेसचे आयोजन नागपूर विद्यापीठामध्ये करण्यात आले होते.
कुलगुरु पदावरुन निलंबन
डॉ चौधरी यांचे 21 फेब्रुवारी 2024 ला कुलपतींकडून निलंबन करण्यात आले होते. मात्र निलंबनाच्या कारवाईमध्ये कायदेशीर प्रक्रियेच पालन न केल्यामुळे त्यांचे निलंबन न्यायालयाने रद्द ठरविले. डॉ. चौधरींनी 11 एप्रिला पुन्हा कुलगुरु पदाचा कार्यभार स्वीकारला परंतु त्यांची उच्च व तंत्रशिक्षण विभागाद्वारे चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर त्यानां कुलगुरु पदावरुन निलंबित करण्यात आले.