(फोटो सौजन्य:Chatgpt)
पुण्यातील चर्चित केतन अग्रवाल हत्याकांडाने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं आहे. सुरुवातीला हा एक साधा अपघात वाटत होता, पण जसजसा तपास पुढे सरकला, तसतसे एक प्लानिंग मर्डेर असल्याचं उघडकीस आलं आणि सर्वांनाच धक्का बसला. पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक आणि २०१६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी संदीप सिंग गिल यांना हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आणण्याचे श्रेय दिले जातं आहे. त्यांच्या तपासामुळे सिया गोयल आणि तिचा साथीदार चेतन चौधरी यांच्या कथित खुनी कटाचा पर्दाफाश झाला. या केसमुळे संदीप सिंग गिल चर्चेत आले असले तरीही त्यांची स्टोरी प्रेरणादायीच आहे. वारंवार अपयश येऊनही त्यांनी कधीही हार मानली नाही, प्राध्यापक म्हणून काम केले आणि अखेरीस यूपीएससी परीक्षेत १४३ वा क्रमांक मिळवून ते आयपीएस अधिकारी बनले.
आयपीएस संदीप सिंग गिल हे महाराष्ट्र केडरचे २०१६ च्या तुकडीचे अधिकारी आहेत. संदीप पंजाबमधील लुधियाना जिल्ह्याचे रहिवासी. त्यांचे बालपण आणि सुरुवातीचे शालेय शिक्षण लुधियानामध्येच झालं. त्यानंतर त्यांनी चंदीगड येथील पंजाब विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात एम.ए. पदवी मिळवली. आज, ते महाराष्ट्र पोलिस दलातील सर्वात कार्यक्षम अधिकाऱ्यांपैकी एक मानले जातात आणि सध्या पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत.
आयपीएस अधिकारी होण्यापूर्वी, संदीप सिंग गिल चंदीगडमधील एका महाविद्यालयात सहायक प्राध्यापक होते. शिकवणे हे त्यांचे काम असले तरी, भारतीय पोलीस सेवेत सामील होण्याचे त्यांचे नेहमीच स्वप्न होते. काम करत असतानाच त्यांनी यूपीएससीची तयारी सुरू ठेवली. त्यांनी अनेक वेळा परीक्षा दिली, पण ते अयशस्वी ठरले. असे असूनही, ते दृढनिश्चयी राहिले आणि आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून राहिले.
संदीप सिंग गिल यांची यशोगाथा खूपच रंजक आहे. २०१५ मध्ये, यूपीएससीने काही उमेदवारांना एक विशेष संधी दिली. संदीप सिंग गिल यांनी या संधीचा फायदा घेतला आणि नागरी सेवा परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करत अखिल भारतीय स्तरावर १४३ वा क्रमांक पटकावला. मुख्य परीक्षेत त्यांचा वैकल्पिक विषय इंग्रजी साहित्य होता. त्यांच्या मेहनतीचे फळ मिळाले आणि त्यांची भारतीय पोलीस सेवेसाठी (IPS) निवड झाली.
महाराष्ट्र केडरमध्ये नियुक्ती झाल्यानंतर, संदीप सिंग गिल यांनी राज्याच्या संस्कृती आणि भाषेशी स्वतःला जुळवून घेतले. असे म्हटले जाते की, त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्याशी फक्त मराठीतच बोलण्याची स्पष्ट सूचना दिली होती. सततच्या सरावामुळे ते आता अस्खलित मराठी बोलतात. यामुळेच स्थानिक लोकांमध्ये त्यांची चांगली प्रतिष्ठा निर्माण झाली आहे.
पुणे ग्रामीणचे एसपी होण्यापूर्वी, संदीप सिंग गिल यांनी पुणे शहरात डीसीपी झोन १ म्हणूनही काम पाहिले आहे. त्यांच्या कार्यकाळात अनेक गुन्ह्यांवर प्रभावीपणे कारवाई करण्यात आली. गणेशोत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखणे आणि गुन्हेगारी नियंत्रणातील त्यांच्या कामाचीही खूप प्रशंसा झाली. ते एक शिस्तप्रिय, तंदुरुस्त आणि शीघ्रबुद्धीचे अधिकारी म्हणून ओळखले जातात.
Lohagad Murder Case: लोहगड हत्या प्रकरणातील व्यावसायिक केतन अग्रवाल नेमके किती शिकले होते? जाणून घ्या त्यांचा शैक्षणिक प्रवास..






