गर्भवतीची चिमुकलीसह विहिरीत उडी (फोटो सौजन्य-X)
उमरेड : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात अवैध सावकारीच्या कर्जबाजारीपणामुळे त्रस्त झालेल्या उमरेड शहरातील मंगळवारी पेठ येथील सागर राजकुमार बावणे (वय 23) या युवकाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली.
मृत सागर बावणे याने काही खासगी सावकारांकडून जास्त दराने व्याजावर पैसे घेतले होते. परंतु, व्याज वाढत चालल्यामुळे मूळ रक्कम फेडणे त्याच्यासाठी अशक्य झाले. त्यामुळे सावकारांकडून सातत्याने धमक्या आणि मानसिक छळ सहन करावा लागत होता. याच छळाला कंटाळून त्याने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा आहे. दरम्यान, उमरेड पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
सागर बावणे याने आत्महत्या का केली? कोणत्या सावकारांनी त्याला मानसिक त्रास दिला, याचीही चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. उमरेडमध्ये अवैध सावकारीमुळे युवक आत्महत्येस प्रवृत्त होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र समोर येत आहे.
अवैध सावकारीचा गोरखधंदा फोफावला
उमरेड शहरात अवैध सावकारी मोठ्या प्रमाणावर फोफावली असून, काही सावकार गरजू कर्जदारांना ठराविक व्याजदर न सांगता 30 ते 40 टक्के दराने व्याज वसूल करतात. यावेळी कोणतेही कायदेशीर कागदपत्र घेतले जात नाहीत. फक्त तोंडी व्यवहारावर कर्ज दिले जाते. व्याज फेडता न आल्यास कर्जदाराच्या घरी जाऊन धमक्या देणे, अपमान करणे हे प्रकार सर्रास घडतात.
जनतेत असंतोष; उच्चस्तरीय चौकशीची मागणी
दरम्यान, या गंभीर घटनेनंतर शहरात संतापाची लाट उसळली असून नागरिक, सामाजिक संस्था आणि युवक संघटनांकडून अवैध सावकारांविरोधात उच्चस्तरीय चौकशी करून कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. पोलिस आणि महसूल प्रशासनाने अवैध सावकारीच्या प्रकरणांकडे लक्ष देऊन गरजू कर्जदारांना न्याय द्यावा, अशी जोरदार मागणी होत आहे.