धक्कादायक ! कूलरचा करंट लागून 3 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू (File Photo : Death)
भिवापूर : घरात खेळणाऱ्या तीन वर्षांच्या चिमुकलीचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाला. या मुलीला कूलरमधून विजेचा जोरदार झटका लागला. त्यातच तिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना झमकोली (ता. भिवापूर) येथे शनिवारी (दि.24) सायंकाळी चारच्या सुमारास घडली. उन्नती अर्जुन बोटरे (वय ३) असे बालिकेचे नाव असून, या घटनेने संपूर्ण गाव हळहळून गेले आहे.
शनिवारी दुपारच्या सुमारास उन्नती नेहमीप्रमाणे घरात खेळत होती. घरातील कूलर सुरू असताना अनावधानाने ती त्याच्या संपर्कात आली. कूलरमध्ये विजेची गळती झाल्याने तिला जबरदस्त करंट बसला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे उन्नती काही क्षणातच कोसळली. घरच्यांनी आणि शेजाऱ्यांनी तातडीने तिच्याकडे धाव घेतली. मात्र, तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. उन्नती ही घरातील एकुलती एक मुलगी असल्याने तिच्या जाण्याने संपूर्ण कुटुंब हादरले आहे. आई-वडिलांवर शोककळा ओढावली.
गावकऱ्यांनीही मोठ्या संख्येने बोटरे कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. या दुर्दैवी घटनेने झमकोली गावात हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्घटनेमुळे घरातील विजेच्या उपकरणांकडे किती दुर्लक्ष होते, हे पुन्हा एकदा समोर आले आहे. कूलरमध्ये करंट कुठून आणि कसा आला, याची चौकशी व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अनेक घरांमध्ये आजही निसर्गाचे तापमान थोपवण्यासाठी वापरली जाणारी उपकरणे तपासणीशिवाय वापरली जातात, हेही या घटनेतन समोर आले आहे
वीज सुरक्षेबाबत जनजागृती करणे आवश्यक
वीज वितरण कंपनी आणि ग्रामपंचायतीकडून नागरिकांमध्ये वीज सुरक्षेबाबत जनजागृती करणे अत्यावश्यक आहे. विजेच्या उपकरणांची नियमित तपासणी, योग्य अर्थिंग आणि वायरिंग सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असल्याचे जाणकार सांगतात. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी शासन आणि नागरिकांनीही दक्षता घेणे गरजेचे आहे.