नराधमाचा कळस
उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये एका ८५ वर्षीय महिलेवर जबरदस्ती करून लैंगिक शोषण झाल्याची अत्यंत अमानवी आणि क्रूर घटना समोर आली आहे. अमानुष मारहाण केल्याने महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना बरेलीतील हाफिजगंज भागातील आहे.
या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, आरोपीचे नाव राकेश असे असून तो शेजारी राहात होता आणि त्याचे वय 35 वर्ष आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. मात्र यामुळे संपूर्ण बरेली हादरले आहे. (फोटो सौजन्य – iStock)
एकटी राहत होती महिला
बरेलीचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक अनुराग आर्य यांनी सांगितले की, मिळालेल्या माहितीनुसार, एक 85 वर्षीय वृद्ध महिला तिच्या घरात एकटीच राहत होती. तिचा नवरा आणि मुलगा आधीच मरण पावले आहेत. महिलेचा भाऊ आणि वहिनी शेजारी राहतात आणि महिलेची सूनही त्यांच्यासोबत राहते.
सुनेने पाहिला अत्याचार
पोलिस अधीक्षकांनी सांगितले की, वृद्ध महिलेच्या सुनेच्या सांगण्यानुसार, सोमवारी दुपारी एकच्या सुमारास ती काही कामानिमित्त घरी गेली असता, परिसरातील राकेश हा तरुण तिच्या वृद्ध आईचे लैंगिक शोषण करत असल्याचे पाहून तिला धक्काच बसला. तर पुढे पोलिसांनी सांगितले की, वृद्ध महिलेच्या सुनेने जेव्हा आरडाओरडा केला तेव्हा आरोपी तरुण राकेशने तेथून पळ काढला. यानंतर कुटुंबीयांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली, मात्र यादरम्यान वृद्ध महिलेचा मृत्यू झाला होता.
आरोपीची चौकशी चालू
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास केला आणि फॉरेन्सिक टीमलाही यावेळी पाचारण केले. वरिष्ठ पोलीस अधीक्षक अनुराग आर्य यांनी सांगितले की, आरोपी मद्यपी असून त्याची चौकशी करण्यात येत आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.