एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर चाकूने सपासप वार (फोटो सौजन्य-एएनआय)
उरणमधील यशश्री शिंदे हत्याप्रकरण ताजे असताना, आता अमरावतीमध्ये धक्कादायक घटना समोर आली. एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने अल्पवयीन मुलीवर चाकूने जीवघेणा हल्ला केला. अमरावती शहरतील राजपेठ अंडरपास मधील बुधवारी सकाळी 8.30 वाजताची ही घटना असून या घटनेमुळे अमरावती शहर हाटरले आहे.
अमरावती शहरातील राजापेठ अंडरपासवरून एक अल्पवयीन मुलगी कॉलेजला पायी जात होती. ती जात असताना मुलीच्या परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने तिच्या गळ्यावर चाकूने हल्ला केला आहे. यात ही मुलगी गंभीर जखमी झाली आहे. जखमी अल्पवयीन मुलीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एकतर्फी प्रेमातून तरुणाने कॉलेजला निघालेल्या तरुणीचा पाठलाग करत तिच्यावर जीवघेणा हल्ला केला. या तरुणीवर उपचार सुरु असून तरुणीच्या गळ्याला 6 टाके पडले आहेत.
हे सुद्धा वाचा: 30 वर्षीय तरुणाची गळा आवळून हत्या, अज्ञात आरोपींचा शोध सुरू
आरोपी तरुण हा गेल्या काही दिवसांपासून तरुणीचा सतत छळ करून तिला पाठलाग करायचा आणि तिचा रस्ता आडवायचा. तरुणीला जीवे मारण्याची आणि ॲसिड हल्ला करण्याची धमकीही आरोपींनी दिली होती. आज (31जुलै) सकाळी ही तरुणी कॉलेजला निघाली होती. त्यावेळी २४ वर्षीय आरोपी तरुण प्रफुल्ल काळकरने तिचा पाठलाग केला आणि सोबत आणलेल्या चाकूने तिच्यावर हल्ला केला. तरुणीच्या शरीरावर आणि मानेवर त्याने चाकूने वार केले. तिने आरडाओरडा केल्यामुळे त्याठिकाणी असलेले रिक्षावाले मदतीसाठी धावून आहे.
हे सुद्धा वाचा: पहिल्या लग्नापासूनचा मुलगा पत्नीने आणला घरी, फसवणुकीमुळे संतापून सावत्र बापाने केली क्रूर हत्या
पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या प्रफुल्लला रिक्षाचालकाने पकडून चोप दिला. त्यानंतर त्यांनी आरोपींना अमरावती शहरातील राजापेठ पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिले. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी मुलीच्या नातेवाईकांनी केली आहे. जखमी तरुणी सध्या अमरावती जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेच . यापूर्वीही तरुणीच्या वडिलांनी येऊन आरोपीविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यावेळी पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्यावर अमरावती येथील राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.